संभाव्य उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका
प्रतिनिधी/ बेंगळूर
लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने मोर्चेबांधणी तयारी सुरू केली आहे. संभाव्य उमेदवार निवडीसंबंधी स्थानिक नेत्यांची मते जाणून अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी मंत्र्यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने मंत्री शिवराज तंगडगी यांची नेमणूक केली आहे. तर चिकोडी-सदलगा मतदारसंघाची जबाबदारी मंत्री डी. सुधाकर यांच्यावर सोपविली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 28 मतदारसंघांमधील निरीक्षक मतदारसंघांचा दौरा करून पक्षातील सर्व स्तरातील नेत्यांशी संपर्क साधून बैठका घेतील. निवडणुकीसाठी पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची निवड करण्यासाठी माहिती जमा करून अहवाल सादर करणार आहे. मंत्र्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातून राज्य मंत्रिमंडळात सामील झालेले सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना विजापूर तर महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना धारवाड लोकसभा मतदारसंघांचे निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.
प्रामुख्याने कोणत्याही दडपणाशिवाय स्थानिक नेत्यांची मते जाणून घेऊन योग्य उमेदवार निवडण्यासाठी अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संभाव्य उमेदवार यादीत कोणाकोणाला स्थान द्यावे, याविषयी स्थानिक नेत्यांची मते निर्णायक ठरणात आहेत. त्यानुसार काँग्रेस हायकमांड अंतिम उमेदवार निवडणार आहे.
मतदारसंघनिहाय निरीक्षक
लोकसभा मतदारसंघ निरीक्षक
बेळगाव शिवराज तंगडगी
चिकोडी-सदलगा डी. सुधाकर
कारवार एच. के. पाटील
विजापूर सतीश जारकीहोळी
धारवाड लक्ष्मी हेब्बाळकर
बागलकोट प्रियांग खर्गे
बिदर संतोष लाड