लोकसभा, राज्यसभेचे कामकाज ठरविल्यापेक्षा अधिक, कोणताही अडथळा नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाच दिवसांचे विशेष संसद अधिवेशन गुरुवारी रात्री 12 वाजता समाप्त झाले आहे. लोकसभेचे काम 12 वाजता, तर राज्यसभेचे त्याच्या आधी काही काळ, अर्थात, 11 वाजून 53 मिनिटांनी संपले. हे अधिवेशन पूर्वनिर्धारित कालावधीपेक्षा एक दिवस आधीच संपले असले तरी कामकाज अधिक झाले असून इतक्या कमी वेळेच्या अधिवेशनात अधिक काम होणे हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्या ठरले.
या अधिवेशनात 8 विधेयके सादर करण्यात येतील असे वृत्त प्रथम प्रसिद्ध झाले होते. प्रत्यक्षात ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक, जे ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ या नावाने ओळखले जात आहे, ते एकच विधेयक संमत करण्यात आले. याशिवाय स्वातंत्र्यप्राप्तीपासूनच्या 75 वर्षांच्या संसदीय इतिहासावर व्यापक चर्चा करण्यात आली. चांद्रयान-3 या अभियानाच्या यशासंबंधीही चर्चा झाली. 5 विधेयके सादर करण्यात आली. तथापि ती चर्चेला घेण्यात आली नाहीत.
लोकसभेचे विनाअडथळा कामकाज
अधिवेशनाच्या चार दिवसांच्या कालावधीत लोकसभेचे कामकाज 31 तास झाले. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार ते 22 तास 45 मिनिटे इतके होणार होते. आतापर्यंतच्या इतिहासात पूर्वनिर्धारित कालावधीपेक्षा अधिक कामकाज होण्याची संसदेच्या 75 वर्षांच्या इतिहासातील ही प्रथम घटना आहे. त्यामुळे लोकसभेच्या दृष्टीने हा एक विक्रमच प्रस्थापित झाला आहे, अशी माहिती देण्यात आली.
राज्यसभेचे कामकाजही अधिक
राज्यसभेचे कामकाज पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार 21 तास 45 मिनिटे इतके होणार होते. मात्र, ते 27 तास 44 मिनिटे झाले. या चार दिवसात लोकसभेच्या कामकाजात एकदाही अडथळा आला नाही. तथापि, राज्यसभेत मात्र कामस्थगिती प्रस्तावामुळे 1 तास 30 मिनिटांचा वेळ वाया गेला, अशी माहिती देण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभा यांनी अनुक्रमे पूर्वनिर्धारित कार्यक्रमापेक्षा 160 टक्के आणि 128 टक्के इतके काम केले अशी आकडेवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाचे कामकाज संपताना घोषित केली. आता संसद अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आली असल्याची घोषणाही करण्यात आली.
लोकसभेचा कामकाज विक्रम
प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार या विशेष संसद अधिवेशनात लोकसभेचे पूर्वनिर्धारित कालावधीपेक्षा अधिक काम होण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. 2020 च्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेने 145 टक्के अधिक काम केले होते. तो विक्रम गुरुवारी मागे पडला. लोकसभेने या अधिवेशनात आपल्या कामकाजाच्या कालावधीपैकी 64 टक्के कालावधी चर्चेत तर 33 टक्के कालावधी संसदीय कामकाजात व्यतीत केला. तर राज्यसभेने आपल्या कामकाजापैकी 51 टक्के समय चर्चेत तर 45 टक्के समय कामकाजात व्यतीत केला, असेही आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
सभागृहात अपशब्द वापरणाऱ्या भाजप खासदाराला नोटीस
गुरुवारी लोकसभेत भारतीय जनता पक्षाचे खासदार रमेश बिधुडी यांनी बहुजन समाज पक्षाचे खासदार कुंवर दानिश अली यांना उद्देशून अपशब्द उच्चारले. त्यांनी त्यांचा उल्लेख ‘दहशतवादी’ असा केला. त्यांचे हे अपशब्द कामकाजातून काढून टाकण्याचा आदेश लोकसभेच्या अध्यक्षांनी दिला. यावेळी अध्यक्षस्थानी कोडीकुन्नील सुरेश हे होते. त्यांनी बिधुडी यांना बोलणे थांबविण्याचा आदेश दिला. तथापि, तो त्यांनी मानला नाही. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिधुडी यांना समज दिली. या सदनात असा व्यवहार चालणार नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी बिधुडींची कानउघाडणी केली. भारतीय जनता पक्षानेही बिधुडी यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बिधुडी यांच्या विधानावर खेद व्यक्त केला. काँग्रेस तसेच अन्य विरोधी पक्षांनी असे अपशब्द उच्चारणाऱ्या खासदारांचे निलंबन करावे, अशी मागणी सभाध्यक्षांकडे केली. एवढा एक प्रसंग सोडला तर पूर्ण चार दिवस कामकाज विनासायास पार पडल्याचे दिसून आले.
राहुल गांधींनी घेतली अली यांची भेट
बिधुरी यांच्या अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बसप खासदार दानिश अली यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. तसेच राहुल यांनी अली यांची गळाभेट घेतली असून याचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. संसदेत भाजप खासदार बिधुडी यांनी अली यांचा अपमान केला होता. भाजप खासदार आक्षेपार्ह वक्तव्य करत असताना भाजपचे दोन माजी मंत्री कुत्सितपणे हसत होते. रमेश बिधुडी यांचे हे कृत्य सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे आहे. देशाच्या लोकशाहीच्या मंदिरात द्वेष अन् घृणास्पद मानसिकतेच्या काँग्रेस विरोधात असल्याचे पक्षाकडून म्हटले गेले आहे.
बॉक्स
कामकाज….
ड चार दिवसांच्या अधिवेशनात लोकसभेचे कामकाज 160 टक्के
ड राज्यसभेतही अधिक कामकाज, दोन्ही सदनांमध्ये सौहार्ददर्शन
ड पाच विधेयके सादर, तथापि, केवळ महिला आरक्षण झाले संमत
ड महिला आरक्षण विधेयकाने लोकशाही बळकट : पंतप्रधान मोदी