पणजी / प्रतिनिधी
नवरात्रौत्सवानिमित्त गोव्यातील मंदिरांमध्ये साजरा होणारा मखरोत्सव व कीर्तन ही एक आगळी आणि प्राचीन परंपरा आहे. कालानुरूप सण-उत्सवांच्या स्वरूपात होणाऱया बदलांतही खास गोमंतकीय परंपरा जोपासणारे असेच एक मंदिर म्हणजे करमळी येथील श्री देवी कमलावती संस्थान आहे. नवरात्रीनिमित्त देवी कमलावती देवस्थानात आयोजित कीर्तन परंपरेस यंदा 32 वर्षे पूर्ण झाली. यावर्षीही रत्नागीरी येथील कीर्तनकार ह. प. भ. सौ. स्पृहा चक्रदेव यांच्या सुश्राव्य कीर्तनांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दरवषी देशातील नामवंत कीर्तनकारास आमंत्रित करून त्यांच्या श्रवणीय व उद्बोधक कीर्तनांचा लाभ भाविकांना करून देण्यास देवस्थानाचे व्यवस्थापन प्रयत्नरत असते. यापुर्वी पुणे, मुंबई, कोल्हापूर, पंढरपूर, सांगली, रत्नागीरी तसेच गोव्यातील अनेक कीर्तनकरांची सुश्राव्य कीर्तन कमलावती मंदिरात रंगली आहेत. आजचा जमाना वेगळा असला तरी करमळीतील देवी कमलावती मंदिरातील कीर्तनांना भाविकांचाही भरघोस प्रतिसाद मिळतांना दिसून येतो.
या कीर्तनांमध्ये श्रोत्यांना राष्ट्रीय एकता, कला, संस्कृती तसेच अध्यात्यामाच्या दृष्टीने ज्ञान प्राप्त होते. तसेच आधुनिक जीवनांतील समस्या, कटकटी यांना कशापद्धतीने सामोरे जावे, याबाबतचे सामाजिक जनजागृती कार्यही कीर्तनकारांकडून केले जात असल्याने श्रोत्यांना ते आवडत असते. कीर्तनामध्ये संगीताची बाजू दमदार असल्याने संगीतप्रेमी भाविकांचे मनतृप्त होते.
कीर्तनाची ही परंपरा सुरू होऊन यंदा 32 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून गेली 14 वर्षे येथील कीर्तनास साथसंगत करणारे हार्मोनियमवादक शेखर पर्वतकर व तबलावादक अरूण सावंत यांचा देवस्थान नवरात्रौत्सव समितीच्या वतीने शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावषीच्या कीर्तनकार ह.भ.प. सौ. स्पृहा चक्रदेव यांचाही यथोचित सन्मान यावेळी करण्यात आला.