दिल्लीतील केजरीवाल सरकारचा निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील सत्तारुढ आम आदमी पक्षाच्या सरकारने बांधकाम क्षेत्राशी निगडित कामगारांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा लागू झाल्याने सध्या दिल्लीमध्ये बांधकाम ठप्प आहे. बांधकाम क्षेत्राचे कामकाज ठप्प झाल्याने घरी बसलेल्या हजारो कामगारांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केला आहे. दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅनचा तिसरा टप्पा लागू करण्यात आला आहे, यामुळे बांधकामावर बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका बांधकाम क्षेत्रातील कामगारांना बसला असल्याने दिल्ली सरकारने प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे.