300 ते 400 रुपयांची झाली वाढ : व्यावसायिक ग्राहकांना दुप्पट बिल : ग्राहकांमधून नाराजी
बेळगाव ; एकीकडे राज्य सरकारकडून वीज बिल 200 युनिटपर्यंत माफ करण्याची घोषणा केली जात असतानाच दुसरीकडे वीज दरवाढीचा दणका देण्यात आला आहे. यामुळे जून महिन्यात 300 ते 400 रुपये वाढीव वीज बिलाचा शॉक देण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यात प्रतिवर्षी एक एप्रिलपासून नवीन विद्युत दर लागू केले जातात. परंतु या वर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच केईआरसीकडून दरवाढ जाहीर करण्यात आली. 12 मे रोजी प्रति युनिट 70 पैसे दरवाढ करण्यात आली. ही दरवाढ जून महिन्याच्या बिलामध्ये समाविष्ट करण्यात येणार होती. त्याचबरोबर इंधन खरेदीमधील समन्वय करण्यासाठी पुन्हा एकदा प्रति युनिट 50 पैसे दरवाढ केली जाणार आहे. जून महिन्याचे वीज बिल 2 तारखेपासून येण्यास सुरुवात झाली. मागील महिन्यातील वीज बिल व चालू महिन्यातील बिल यामध्ये 300 ते 400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात काही ग्राहकांनी हेस्कॉम कार्यालयात चौकशी केली असता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजेचा वापर वाढला असल्याचे कारण त्यांना देण्यात आले. वाढीव वीज बिलाच्या दणक्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
उद्योगांनाही बसतोय फटका
वाढीव वीज बिलाचा फटका केवळ घरगुती ग्राहकच नाही तर व्यावसायिक ग्राहकांनाही बसत आहे. आधीच उद्योगधंदे वाढत्या महागाईमुळे होरपळत असताना त्यातच आता वाढीव वीज बिल भरावे लागणार आहे. लघुउद्योजक, लहान व्यापारी यांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.