गुजरात सरकारकडून ऑर्डर : बसना वाढतेय पसंती
वृत्तसंस्था/ मुंबई
हिंदुजा समूहातील अशोक लेलँड कंपनीला अलीकडेच 1282 बसचे कंत्राट प्राप्त झाले आहे. सदरचे कंत्राट हे कंपनीला गुजरातमधील राज्य रस्ते परिवहन निगमकडून मिळाले आहे. एखाद्या कंपनीला अशाप्रकारे राज्य सरकारकडून कंत्राट मिळवण्यात अशोक लेलँड ही मोठी कंपनी ठरली आहे. या कंत्राटामार्फत अशोक लेलँडला बसच्या बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करता येणे शक्य होणार आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी शेणू अग्रवाल यांनी सांगितले की, गुजरात राज्याकडून बसचे जे कंत्राट मिळाले आहे त्याने कंपनीला खूप आनंद झाला आहे. अशोक लेलँडच्या बसना ग्राहकांची पसंती असल्याचे यावरुन सिद्ध होते. दीर्घकाळ टिकणाऱ्या बसेस तसेच मजबुती व आधुनिक तंत्रज्ञानाचा केला जाणारा अवलंब ही कारणे बसची पसंती वाढवत आहेत. वाहनांच्या निर्मितीत दर्जात कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. आगामी काळात अशोक लेलँड 55 सिटची बस निर्मिती करुन तिचे वितरण करणार आहे. बीएस 6 या प्रणालीनुसार कंपनीच्या बस तयार केल्या जात असून सध्याला 2600 पेक्षा अधिक बसेस यशस्वीपणे रस्त्यांवर धावत असल्याचे सांगितले जात आहे.
दुसरी मोठी बस निर्माती कंपनी
अशोक लेलँड ही भारतातील दुसरी सर्वात मोठी अशी व जगातील चौथ्या क्रमांकाची बस निर्माती कंपनी गणली जाते. गुजरातमधील नव्या ऑर्डरमुळे कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे.