विसर्जन मिरवणुकीत सांभाळली महत्त्वाची जबाबदारी : उंच मूर्ती ठरत होत्या धोक्याच्या
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात सर्वात मोठा गणेशोत्सव बेळगावमध्ये होतो. यावेळी भव्यदिव्य अशी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सुरळीत पद्धतीने पार पडावी, यासाठी हेस्कॉमच्या 150 हून अधिक अधिकारी व कर्मचारी विसर्जन मार्गावर कार्यरत होते. यावषी गणेशमूर्तींची उंची अधिक असल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हेस्कॉमचे कर्मचारी खबरदारी घेत होते.
विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक हुतात्मा चौकापासून कपिलेश्वर मंदिरापर्यंत उपस्थित असतात. त्यामुळे या भागात सुरळीत वीजपुरवठा देणे ही मोठी जबाबदारी हेस्कॉमवर असते. यासाठी शहर उपविभागाच्यावतीने 130 हून अधिक कर्मचारी व 20 हून अधिक अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळपासून शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अखंडपणे या कर्मचाऱयांनी सेवा बजावली.
मागील दोन वर्षांत गणेशोत्सवावर निर्बंध आल्यामुळे यावषी गणेशमूर्तींची उंची वाढविण्यात आली होती. ट्रॉलीवरून गणेशमूर्तींची उंची 15 ते 18 फुटांपर्यंत असल्यामुळे मंडपापासून गणेशमूर्ती बाहेर काढणे हे आव्हान होते. त्यामुळे काही भागातील वीजवाहिन्या काढून गणेशमूर्ती मुख्य विसर्जन मार्गापर्यंत आणण्यात येत होत्या. त्यामुळे हेस्कॉमच्या कर्मचाऱयांना तारेवरची कसरत करावी लागली. संपूर्ण विसर्जन मार्गावर हेस्कॉमचे कार्यकारी अभियंते एम. टी. अप्पण्णावर, साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर, संजीव हम्मण्णावर यांसह सर्व सेक्शन ऑफिसर व लाईनमन यांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक सुरळीत पद्धतीने पार पडली.