खानापूर तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट
खानापूर
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील चांद्रयान-3 चे प्रक्षेपण शुक्रवारी करण्यात आले. आंध्रप्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून दुपारी 2.35 वाजता एलव्हीएम 3-एम-4 रॉकेटच्या माध्यमातून हे अवकाशात पाठविण्यात आले. या यशाबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक होत आहे. या मोहिमेत खानापूर तालुक्यातील अनगडी या दुर्गम गावातील युवा शास्त्रज्ञ प्रकाश पेडणेकर यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर निपाणी तालुक्यातील आडी येथील केरबा लोहार यांनीही भरीव कामगिरी केल्याने खानापूर व निपाणी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. या मोहिमेत खानापूरचे प्रकाश नारायण पेडणेकर यांचा सहभाग असून अनगडी या गावातच प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेऊन कापोली हायस्कूलमधून त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर बेळगाव जीएसएस कॉलेजमध्ये बारावी झाल्यानंतर जीआयटी विद्यालयातील तांत्रिक शिक्षणाची पदवी पूर्ण केली. काहीकाळ इतर ठिकाणी नोकरी केल्यानंतर त्यांची शिक्षणाची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यानंतर वीट व्हेलोरा आणि व्हीट्स पिलाणी या विद्यापीठातून त्यांनी मास्टर इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर इस्त्रोच्या मुलाखती निघाल्या होत्या. त्यात उत्तीर्ण होऊन त्यांनी इस्त्रोत सेवा सुरू केली. चांद्रयान-2 मोहिमेतही ते सहभागी होते. मात्र ती मोहीम अयशस्वी झाली होती. त्यानंतर चांद्रयान-3 मोहिमेतील शास्त्रज्ञात त्यांचा सहभाग निश्चित करण्यात आला. चांद्रयानाला इंधन पुरवठासंबंधी विभागात त्यांचा सहभाग होता. प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीत घेऊन त्यांनी उत्तुंग भरारी घेतल्याने पुन्हा एकदा मातृभाषेतील शिक्षण अधोरेखित झाले आहे.
भारताची एक यशस्वी कामगिरी
तरुण भारतने प्रकाश पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. चांद्रयान-3 च्या मोहिमेत रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनच्या कमांडिंग स्टेज आणि कमांडिंग सिस्टीम या 25 स्टेजच्या अत्यंत गुंतागुंतीचे काम असलेल्या ठिकाणी सहा वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगितले. क्रायोजेनिक इंजिन हे भारताची एक यशस्वी कामगिरी आहे. जगातील फक्त सहा देशातून या इंजिनची निर्मिती केली जाते. या चांद्रयानला स्वत:चे दोन इंजिन आहेत ते चंद्रापर्यंत पोहोचविणार आहेत. 23 ऑगस्ट रोजी हे यान यशस्वी उतरून तेथील छायाचित्रे पाठविण्यास सुरुवात झाल्यास ही मोहीम यशस्वी झाली असे म्हणता येईल, असे त्यांनी सांगितले.
आडीच्या शास्त्रज्ञाची भरीव कामगिरी
निपाणी : 1972 साली जन्मलेल्या केरबा लोहार यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण सौंदलगा येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे घेतले. यानंतर बेळगाव येथील सरकारी पॉलिटेक्निकमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा पूर्ण केला. यानंतर अवकाश क्षेत्रातील संशोधनाविषयी आवड निर्माण झाल्याने त्यांनी या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 1994 साली भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या बेंगळूर येथील मुख्य कार्यालयात तांत्रिक साहाय्यक म्हणून रुजू झाले. पुढे येथे सेवा बजावतच त्यांनी बीई आणि एमईचे शिक्षण पूर्ण केले. झोकून देऊन काम करण्याच्या हातोटीमुळे त्यांना वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून बढती मिळाली. केरबा लोहार यांनी चांद्रयान-1, मंगळयान यामध्ये मोलाची भूमिका बजावली. चार वर्षांपूर्वी अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान- 2 या मोहिमेतही त्यांचा सहभाग होता. रॉकेटच्या सहाय्याने चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत गेल्यानंतर तेथून त्याला चंद्राच्या कक्षेत नेणे, चंद्रावर उतरणे आणि चंद्रावर उतरल्यानंतर तेथील वैज्ञानिक माहिती संकलित करणे ही कामे ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हर यांच्या माध्यमातून होतात. या ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचे डिझाईन करण्याच्या कामात केरबा लोहार हे सहभागी आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.