राज्यातील मल्ल द्विधामन स्थितीत : परिषदेच्या बरखास्तीनंतर संयोजनावरुन दावे-प्रतिदावे : ऍडहॉक समिती विरुद्ध बाळासाहेब लांडगे यांच्यात आखाड्य़ा बाहेर कुस्ती
संग्राम काटकर/कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्तीनंतर नेमलेल्या ऍडहॉक समितीने आठच दिवसांपूर्वी 15 ते 30 डिसेंबर दरम्यान, वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) आयोजित करत असल्याची घोषणा केली. यानंतर लगेच पुर्वीच्या राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी ही पत्रकार परिषदेद्वारे महाराष्ट्र केसरी व अधिवेशन आयोजित करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्यातील मल्लांना लांडगे यांनी जाहीर केलेल्या की ऍडहॉक समितीच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असा प्रश्न सतावत आहे. अशातच लांडगे यांनी जाहीर केलेली स्पर्धा ही अनधिकृत असून त्यात जे मल्ल, पंच सहभागी होतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा भारतीय कुस्ती महासंघाने दिला आहे.
चार महिन्यांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सत्ता असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त केल्याने कुस्तीक्षेत्र हादरून गेले. बरखास्तीनंतर परिषदेवर ऍडहॉक समिती नेमून तिलाच 24 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यास सांगितले. वर्धा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी तर राजकीय डाव टाकत संपूर्ण निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे शरद पवार यांची परिषदेवरील सत्ता धोबीपछाड झाली. पण निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यासाठी काही दिवसांचा अवधी होता. हीच संधी समजून लांडगे यांनी कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती व निवडणुकीचे प्रकरण उच्च न्यायालयात नेले.
गेल्या 13 व 17 ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत लांडगे यांच्या वकीलाने युक्तीवाद करताना कुस्तीगीर परिषदेची बरखास्ती व ऍडहॉक समितीने घेतलेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचे सांगितले. याचबरोबर ऍडहॉक समितीच्या वकिलांनी परिषदेतील गैरकारभार व भारतीय कुस्ती महासंघाच्या सूचनांकडे परिषदेने केलेले दुर्लक्ष यासह विविध मुद्दे मांडत, कुस्तीगीर परिषदेवरील केलेली बरखास्तीची कारवाई व त्यानंतर ऍडहॉक समितीने लावलेली निवडणूक ही योग्य असल्याचे सांगतिले. न्यायालयाने दोन्ही वकिलांचे म्हणणे ऐकुण घेऊन निवडणुकीची प्रक्रिया जैसे-थे ठेवण्याचा आदेश ऍडहॉक समितीला देत सुनावणी पुढे ढकलली. तेव्हापासून आजतागायत सुनावणी झालेली नाही.
ऍडहॉक समितीनेही तयारीचा भाग म्हणून आठच दिवसांपूर्वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) आयोजित करत असल्याचे जाहीर केले. तसेच आपल्याशी संलग्न असलेल्या महाराष्ट्रातील सर्व जिल्हा संघटनांना स्पर्धेसाठी माती व मॅटवरील जिल्हा संघ निवड चाचणी घेण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील, असेही सांगितले. याबाबतची माहिती कळताच राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांनी ही चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेद्वारे महाराष्ट्र केसरी स्पर्धा व अधिवेशन आयोजित करत असल्याचे जाहीर करत लवकरच स्पर्धेची तारिखही जाहीर करु असे सांगितले. मात्र या सगळ्या वादाच्या प्रकरणामुळे मल्लांना नेमकी अधिकृत स्पर्धा कोणाची आणि कोणाच्या स्पर्धेत सहभागी व्हायचे असा प्रश्न आता सतावत आहे. तसेच महाराष्ट्र केसरी व अधिवेशनची घोषणा झाल्याने मल्लांनी आपल्या दैनंदिन सरावाचा जोरही वाढवला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून मल्ल आणि वस्ताद डावांचा अभ्यास करु लागले आहेत. या सगळया हिंदोळ्यात चार दिवसांपूर्वी भारतीय कुस्ती महासंघाने लांडगे यांनी जाहीर केलेली स्पर्धा अनाधिकृत असल्याचा शेरा मारला आहे. जे मल्ल व पंच लांडगे यांच्या स्पर्धेत सहभागी होतील, त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा इशारा देणारे पत्र काढले आहे. त्यामुळे मल्ल व पंचांना सावधगिरीनेच निर्णय घ्यावा लागले, अशी सद्यस्थिती आहे.
बाणगेत होणार जिल्हा संघ निवड चाचणी…
कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्याने तिच्याशी संलग्न कोल्हापुरातील तालीम संघासह राज्यातील सर्व कुस्ती संघटना व तालीम संघांचे अधिकारही बरखास्त झाले आहेत. मात्र परिषदेवरील ऍडहॉक समितीशी ज्या संघटना संलग्न आहेत, त्यांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी गादी व मॅटवरील जिल्हा संघ निवड चाचणी घेण्याचा अधिकार आहे. त्यानुसार लवकरच बाणगे (ता. कागल) येथे ऍडहॉक समितीशी संलग्न कोल्हापूर जिल्हा रेसलिंग फेडरेशनतर्फे जिल्हा संघ निवड चाचणी आयोजित केली जात आहे. रवींद्र पाटील (अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा रेसलिंग फेडरेशन)
लवकरच वेळापत्रक जाहीर करु…
राजर्षी शाहू महाराजांचा वारसा जपत कुस्तीगीर परिषद गेल्या 70 वर्षांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करत आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धाही परिषदेलाच आयोजित करण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार लवकर स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. मल्लांनी सहकार्य करण्याची भावना ठेवावी.
बाळासाहेब लांडगे (सचिव ः राज्य कुस्तीगीर परिषद)