विरोधी गटाचे केवळ सहा सदस्यच उपस्थित : विरोधी बाकावरच्या अधिकतर खुर्च्या रिकाम्या
बेळगाव : मान्सूनपूर्व विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. परंतु, या आढावा बैठकीकडे विरोधी गटाने पाठ फिरविल्याचे दिसून आले. विरोधी गटाचे केवळ सहा सदस्य उपस्थित होते. यामुळे विरोधी बाकावरच्या अधिकतर खुर्च्या रिकाम्या असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मागील अनेक दिवसांपासून महापालिकेत बैठक होऊ शकली नव्हती. येत्या आठवडाभरात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी शहरात होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी महापौर शोभा सोमनाचे यांनी बैठक बोलाविली होती. या बैठकीला आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते. परंतु, बैठकीवेळी विरोधी गटातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. म. ए. समितीच्या वैशाली भातकांडे, शिवाजी मंडोळकर यांनी आपल्या वॉर्डमधील नालेसफाईच्या समस्या मांडल्या. त्याचबरोबर बसवराज मोदगेकर, अझीम पटवेगार यांनीही आपल्या भागात अर्धवट स्थितीत असलेल्या कामांचा पाढा वाचला. परंतु, इतर सदस्य अनुपस्थित असल्याने विरोधी बाकाच्या खुर्च्या खाली असल्याचे दिसून आले.