केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दाखवला हिरवा झेंडा
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल बसला केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीतील ड्युटी मार्गावर सोमवारी हिरवा झेंडा दाखवला. बस चालवण्यासाठी इंधन सेल हायड्रोजन आणि हवा वापरून वीज निर्माण करते. सदर सेवा पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या पारंपारिक बसेसपेक्षा अधिक पर्यावरणपूरक आहे. ग्रीन हायड्रोजनवर चालणारी बससेवा देशातील शहरी वाहतुकीचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सोमवारी देशात ग्रीन हायड्रोजन उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रालयाच्या पुढाकाराचा एक भाग म्हणून दिल्लीत पहिली ग्रीन हायड्रोजन इंधन सेल बस सुरू केली. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन असून ते भारताला डीकार्बोनायझेशनची उद्दिष्टे साध्य करण्यास आणि स्वच्छ ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यास मदत करू शकते, असा दावा त्यांनी या बसच्या लॉन्चिंगप्रसंगी केला. नजिकच्या काळात मी या प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण करीन आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी शुभेच्छा देतो, असे हरदीपसिंग पुरी उद्घाटनप्रसंगी म्हणाले.
प्रायोगिक तत्वावर सुरू
सुऊवातीला केवळ दोन बसेस चाचणीच्या आधारावर सुरू करण्यात आल्या आहेत. हायड्रोजनवर चालणाऱ्या या बस एकावेळी 300 किलोमीटरहून अधिक प्रवास करू शकतील. पेट्रोल आणि डिझेल वाहनांमुळे प्रदूषणात सातत्याने वाढ होत आहे. हे थांबवण्यासाठी पुढाकार घेत हायड्रोजनवर चालणाऱ्या पहिल्या बसेस देशात दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉलवर चालणारी वाहने आणि इतर पर्यायी इंधनांवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.
दिल्ली एनसीआर प्रदेशात लवकरच आणखी 15 इंधन सेल बस चालवण्याचा सरकारचा विचार आहे. हायड्रोजन हे भविष्यातील इंधन मानले जात असून त्यामध्ये भारताला डीकार्बोनायझेशनचे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत करण्याची अफाट क्षमता असल्याचे मानले जाते. 2050 पर्यंत हायड्रोजनची जागतिक मागणी चार ते सात पटीने वाढून 500-800 दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे. देशांतर्गत मागणी सध्याच्या 6 दशलक्ष टनावरून 2050 पर्यंत 25-28 मेट्रिक टन पर्यंत चार पटीने वाढण्याची अपेक्षा आहे.
बसची वैशिष्ट्यापूर्णता
ग्रीन हायड्रोजन बस हे शून्य-उत्सर्जन वाहन असून ते हायड्रोजन आणि हवेचा वापर करून बस चालवण्यासाठी वीज निर्माण करते. या बसमध्ये हायड्रोजनचा वापर इंधन म्हणून केला जाऊ शकतो. इलेक्ट्रोकेमिकल रिअॅक्शन अॅनोडमध्ये इंधन (हायड्रोजन) आणि पॅथोडमध्ये हवेतील ऑक्सिजनचे पाण्यात रुपांतर करते आणि इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात विद्युत ऊर्जा तयार करते. इंधन सेल वाहनांमध्ये बॅटरी वाहनांपेक्षा लांब श्रेणी आणि कमी इंधन भरण्याची आवश्यकता असते.
ग्रीन हायड्रोजनवर धावणारी पहिली बस
इंडियन ऑईलने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील नियुक्त मार्गांवर ग्रीन हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या 15 इंधन सेल बसेसच्या परिचालन चाचण्या सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वप्रथम, दिल्लीच्या इंडिया गेटवरून दोन इंधन सेल बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑईलने फरिदाबाद पॅम्पसमध्ये एक अत्याधुनिक वितरण सुविधा देखील स्थापित केली असून सौर पीव्ही पॅनेल वापरून इलेक्ट्रोलिसिसमधून तयार केलेल्या ग्रीन हायड्रोजनला इंधन देऊ शकते.