वाहनचालकांना अडवून चुकांबद्दल दिली समज : हेल्मेट वापरले तरी त्याचा बेल्ट लावणेही आवश्यक,आरसे न वापरणे, काळ्या काचांबाबतही मार्गदर्शन
पणजी : राज्यात सध्या रस्ते अपघातात अनेकांचे बळी जात असून, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता अपघातात बळी जातात याला कारणीभूत हे बेशिस्त चालकच आहेत. कारण घरातून बाहेर पडताना आपल्या पाठीमागे कुटुंब आहे याची जाणीव न ठेवता अतिवेगात वाहने चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल पडलेले असतानाही लक्ष न देता सुसाट निघून जाणे या कारणामुळेही अपघातास निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट परिधान करण्याबरोबर बेल्ट लावणेही विसरता कामा नये, अशा शब्दांत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी वाहनचालकांना मार्गदर्शन केले. काल शुक्रवारी पणजीत वाहतूक पोलीस खाते आणि पोलीस मुख्यालयातर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर, पणजी पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर, वाहतूक पोलीस निरीक्षक चेतन सुर्लकर व इतर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पणजीत जनजागृती मोहीम राबविताना पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केली. त्यात अनेक वाहनचालकांकडे वाहन परवाने नसल्याचे दिसून आले. तसेच ज्या वाहनांना नंबर प्लेट नाहीत अशा चालकांनाही ताब्यात घेऊन पोलिसांनी दंड ठोठावून गंभीर सूचना केल्या. पणजीत राबविलेल्या या मोहिमेमुळे काही वाहनचालक पोलिसांचा डोळा चुकवून वाहने घेऊन जात होते. त्यांच्यावरही पोलिसांनी करडी नजर ठेवून त्यांना ताब्यात घेतले.
परवाना नसतानाही खटारा वाहन रस्त्यावर
अत्यंत जुनाट असे जीए-07 एफ-1049 या क्रमांकाचे मालवाहतूक वाहन पणजीत बिनधास्तपणे चालवले जात होते. या वाहनावरील चालकाकडे कोणताही वाहन परवाना नव्हता. वाहनाची कागदपत्रेही सोबत नव्हती. तरीही भरलेले गॅस सिलिंडरची वाहतूक बिनदिक्कतपणे सुरू होती. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून तपासणी केली आणि वाहन ताब्यात घेतले.
मॉडिफाईड दुचाकी काय कामाची
आजकाल फॅशनच्या नावाखाली वाहने मॉडिफाईड करण्याचे फॅड युवकांच्या डोक्यात आहे. पोलिसांनी अशी वाहनेही ताब्यात घेऊन चालकांना तंबी देण्यात आली. मॉडिफाईड केलेल्या वाहनांना नंबर प्लेट नव्हती. हॉर्नही विचित्र आवाजाचे असल्याचे पोलिसांना दिसून आले. शिवाय काही वाहनांना बाजूचे आरसे नसल्याने पोलिसांनी अशी वाहने अडवून चालकांना योग्य सूचना दिल्या.