होसूर, बसवाण गल्ली येथील घटना, संशयित ताब्यात
बेळगाव : भाऊबंदकीच्या वादातून होसूर बसवाण गल्ली येथे चुलत भावानेच चुलत भावाचा चाकूने हल्ला करून खून करण्यात आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी संशयित चुलत भावाला ताब्यात घेतले आहे. मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28, रा. होसूर बसवाण गल्ली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बघून येऊन मिलिंद आपल्या घरी झोपला होता. त्यावेळी त्याच्या चुलत भावाने चाकूने मांडीवर वार केला असून रक्तस्त्रावामुळेच अंथरुणावरच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार उघडकीस येताच शहापूर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अभिजित अशोक जाधव (वय 35 रा. होसूर बसवाण गल्ली) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी करण्यात येत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेल्या मिलिंद हा शिवजयंती चित्ररथ मिरवणूक बघण्यासाठी गेला होता. सकाळी तो आपल्या घरी येऊन झोपला होता. मिलिंदची आई जुने बेळगाव येथील आपल्या भावाकडे गेली होती. त्यामुळे घरात इतर कोणी नव्हते. हीच संधी साधून त्याच्या चुलत भावाने चाकूने मांडीवर वार केला आहे. अतिरक्तस्त्रावाने मिलिंदचा मृत्यू झाला. भाऊबंदकीच्या वादातून हा प्रकार घडला आहे. एका बेकरीवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू होता. याच वादातून मिलिंदचा खून झाल्याचा संशय आहे. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. अभिजितची कसून चौकशी करण्यात येत आहे.