भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) ने कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा दिला असून सीपीआय विधानसभेच्या सात जागांवर निवडणूक लढवत आहे. दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असल्याचे रणदिप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुरजेवाला म्हणाले, “कर्नाटकमधील काँग्रेस पक्षाला कोणत्याही अटी आणि मागण्यांशिवाय पाठिंबा देण्याचे सीपीआयने मान्य केले आहे. सीपीआय राज्यातील सात जागांसाठी निवडणूक लढवत असून या सात जागांवर कॉंग्रेस आणि सीपीआय उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. 215 जागांवर सीपीआयने काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. सीपीआयने भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला मनापासून मदत करण्याचे ठरवले आहे.”
काँग्रेसने याआधीच 224 पैकी 223 मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटमध्ये काँग्रेसने सर्वोदय कर्नाटक पार्टी (SKP) च्या दर्शन पुट्टनय्या यांना पाठिंबा दिला आहे. वोक्कलिगा समुदायाचे प्रभावक्षेत्र असलेल्या मेलुकोटे या जाग्यावर SKP आणि JD(S) पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.