कृष्णात पुरेकर,कोल्हापूर
Kolhapur CPR Hospital News : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीक्षित यांनी सेवानिवृत्तीच्या महिनाभर आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली. दरम्यान उन्हाळी सुटी लागल्याने डॉ. शैलेंद्र जाधव यांच्याकडे प्रभारी अधिष्ठाता म्हणून तात्पुरता पदभार देण्यात आला. सोमवारी व्हेकेशन, सुट्टी संपत असल्याने सेवाज्येष्ठतेनुसार डॉ. आरती घोरपडे यांची प्रभारी अधिष्ठातापदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘प्रभारी’ऐवजी अधिष्ठाता म्हणून चांगला अधिकारी मिळावा, अशी अपेक्षा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.
कोल्हापुरात तत्कालीन सार्वजनिक आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या प्रयत्नातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले. महाविद्यालयाचा 25 जानेवारी 2001 मध्ये डॉ. चंद्रकांत शितोळे यांनी पहिले अधिष्ठाता म्हणून 8 महिने पदभार स्वीकारला. त्यानंतर डॉ. आशा प्रतिनिधी यांनी 2004 पर्यत अधिष्ठातापदी काम पाहिले. त्यांच्यानंतर तीन प्रभारी अधिष्ठाता झाले. डॉ. व्ही. व्ही. वझे अधिष्ठाता झाल्यानंतर दोघांनी प्रभारी म्हणून महाविद्यालयाचे काम पाहिले. डॉ. आर. एम. पोवार 2009 मध्ये अधिष्ठाता होते. त्यांच्यानंतर पुन्हा 5 विभागप्रमुख, प्राध्यापकांनी प्रभारी म्हणून येथे काम पाहिले.
डॉ. दशरथ कोठुळे यांनी अधिष्ठाता म्हणून चांगले काम केले. पण त्यांच्यानंतर पुन्हा तिघांनी प्रभारी म्हणून कारकीर्द गाजवली. डॉ. एस. डी. नणंदकर 2018 मध्ये अधिष्ठाता झाले, त्यांच्यानंतर दोघांनी प्रभारी म्हणून काम पाहिले. कोरोना काळात डॉ. मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता झाल्या. त्यांनी चांगले काम केले, पण त्यांच्या अचानक बदलीनंतर डॉ. आरती घोरपडे यांनी प्रभारी अधिष्ठाता म्हणून काही महिने काम पाहिले. डॉ. चंद्रकांत मस्के यांनी 4 महिने अधिष्ठाता म्हणून काम पाहिले. त्यांच्या बदलीनंतर डॉ. आरती घोरपडे, डॉ. एस. एस. मोरे यांनी प्रभारी म्हणून कामकाज केले. त्यानंतर 3 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. प्रदीप दीक्षित यांनी अधिष्ठाता म्हणून 15 मे 2023 पर्यत पावणेदोन वर्षे काम पाहिले, अन् एक महिना आधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.
डॉ. दीक्षित यांनी प्रभारी अधिष्ठाता म्हणून डॉ. शैलेंद्र जाधव यांच्याकडे पदभार सोपवला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला उन्हाळी सुटी, व्हेकेशन लागले. त्यामुळे अधिकतर विभागप्रमुख, प्राध्यापक सुटीवर होते. उन्हाळी सुटी सोमवारी संपत आहे. अन् त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार प्रभारी अधिष्ठातापद पुन्हा एकदा डॉ. आरती घोरपडेंकडे येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच 15 दिवसांचा अधिष्ठाता म्हणून डॉ. जाधव यांची नोंद होण्याची शक्यता आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यत 22 वर्षांत 17 प्रभारी अधिष्ठाता झाले. यामध्ये डॉ. आर. के. कलघटगी, डॉ. उषा पालकर, डॉ. व्ही. बी. बोराडे, डॉ. एन. जी. हेरेकर, डॉ. अरूण जामकर, डॉ. एम. पी. प्रचंड, डॉ. अरूण कावले, डॉ. आर. डी. थोरात, डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. अजित लोकरे, डॉ. एस. एस. मोरे यांनी कार्यभार पाहिला आहे. सध्या डॉ. शैलेंद्र जाधव प्रभारी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.