13 तास चालली चित्ररथ मिरवणूक : शिवप्रेमींचा हिरमोड
बेळगाव : शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावर्षी शिवजयंती उत्सव मंडळाने डीजेला फाटा देत एक वेगळा आदर्श निर्माण केला. परंतु मिरवणुकीतील विस्कळीतपणामुळे चित्ररथ पाहण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला. मारुती गल्ली येथे मिरवणूक सुरू असताना चित्ररथ 3 ते 4 तास एकाच ठिकाणी थांबल्याने संताप व्यक्त करण्यात आला. त्यामुळे यावर उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. बेळगावच्या ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीला शनिवारी सायंकाळी 6 वाजता नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात झाली. काही मोजक्या शिवजयंती मंडळांनी 6.30 ते 7 या दरम्यान देखाव्यांना सुरुवात केली. उर्वरित मंडळांनी मात्र रात्री 9 नंतर देखावे सादरीकरणाला सुरुवात केल्याने काहीसा उशीर झाला. दुपारी 1 वाजता मारुती गल्ली येथे चित्ररथ आणून लावले असले तरी सुरुवात मात्र रात्री 9 वाजता केल्याने उर्वरित चित्ररथांना याचा फटका बसला.
45 ते 50 चित्ररथ सहभागी
शनिवारी सायंकाळी 6 वाजता सुरू झालेली चित्ररथ मिरवणूक रविवारी सकाळी 7 वाजता संपली. यामुळे 13 तास चाललेल्या या मिरवणुकीमध्ये अंदाजे 45 ते 50 च्या आसपास चित्ररथ सहभागी झाले होते. बेळगाव, शहापूर, नेहरुनगर, सदाशिवनगर या परिसरातील चित्ररथ त्याचबरोबर डीजे सहभागी झाले होते. सकाळी 7 पर्यंत डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती. सकाळी 6 नंतर चित्ररथ पुढे मार्गस्थ करण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.
काही मंडळांचा आततायीपणा
चित्ररथ मिरवणुकीला नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात होते. तेथूनच एका पाठोपाठ एक चित्ररथ पुढे सरकत असतात. परंतु रात्री 10 नंतर 13 ते 14 मंडळांनी रामदेव गल्ली येथे मधूनच मिरवणुकीमध्ये प्रवेश केला. यामुळे मारुती गल्लीत असणारे चित्ररथ 3 ते 4 तास तेथेच थांबून राहिले. कामत गल्ली, शिवाजीनगर येथील चित्ररथ पहाटे 4 पर्यंत गणपत गल्लीच्या कॉर्नरवर अडकून पडले. यामुळे चित्ररथावरील कलाकारांमधून संताप व्यक्त केला जात होता. इतका खर्च करून तयार केलेला देखावा वेळेअभावी नागरिकांसमोर सादर करता न आल्याने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
मध्यरात्रीनंतर डीजेचा दणदणाट
दरवर्षी मुख्य मिरवणुकीमध्ये देखावे सादर करत असतानाच काही डीजे लावणारी मंडळे मध्ये शिरत होती. परंतु यावर्षी पोलिसांच्या नियोजनामुळे डीजेला फाटा देण्यात आला. ज्या मंडळांनी डीजे लावले त्यांना सर्वात शेवटी मिरवणुकीत प्रवेश देण्यात आला. मध्यरात्री 2 नंतर डीजेचा दणदणाट पाहायला मिळाला. सकाळी 6 वाजेपर्यंत डीजेच्या तालावर तरुणांसह तरुणीही फेर धरत होत्या.
पोलिसांच्या प्रयत्नाला यश
मागील काही वर्षात अनेक शिवजयंती उत्सव मंडळांनी पारंपरिकता बाजूला ठेवत डीजेला प्राधान्य दिले होते. यामुळे वादावादीचे प्रकार वाढले होते. हे थांबवण्यासाठी यावर्षी पहिल्यापासूनच पोलिसांनी डीजेला परवानगी नाही, अशी भूमिका घेतली. चित्ररथ मिरवणुकीत देखावे सादर करणाऱ्या मंडळांनी डीजे लावले होते. त्यांना आक्षेप घेत ते उतरविण्यास लावले. पोलिसांनी यावर्षी कडक भूमिका घेतल्यामुळे मुख्य मिरवणुकीत डीजेचा दणदणाट झाला नाही. त्यामुळे पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले.