भारतीय वंशाच्या नेत्याचे ट्रुडो यांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ टोरंटो
भारतविरोधी घटकांना बळ पुरविणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता स्वत:च्याच सापळ्यात अडकत चालले आहेत. ट्रुडो यांच्याकडे कॅनडातील एका प्रभावशाली पंजाबी नेत्याने केलेल्या मागणीला उत्तर देणे त्यांच्यासाठी सोपे नसेल. कॅनडात शिखांच्या छोट्याशा समुहाला खलिस्तान हवा असल्यास त्यांना तो अल्बर्टा किंवा सस्कॅचवानमध्ये निर्माण करून दिला जावा असे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच् प्रीमियर आणि भारतीय वंशाचे नेते उज्ज्वल दोसांझ यांनी ट्रुडो यांना उद्देशून म्हटले आहे.
कॅनडात बसून जे खलिस्तानची मागणी करत आहेत ते भारताला तोडू शकत नाहीत. भारतातील शिख खलिस्तान इच्छित नाहीत. चालू वर्षाच्या प्रारंभी मी भारतात होतो आणि याची पुष्टी करू शकतो. मग भारताने या केवळ नारेबहाद्दरांची चिंता का करावी असेही त्यांनी म्हटले आहे.
कॅनडात शिखांची संख्या केवळ 2 टक्के आहे. कॅनडातील या छोट्या समुदायाला खलिस्तान हवा असल्यास तो त्यांना अल्बर्टा किंवा सस्कॅचवानमध्ये निर्माण करून देण्यात यावा असे दोसांझ यांनी म्हटले आहे.
कॅनडाची एकूण लोकसंख्या 4 कोटी आहे. तर 2021 च्या जनगणनेनुसार कॅनडात शिखांचे प्रमाण 7 लाख 70 हजार इतके आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या सुमारे 2.1 आहे. परंतु कॅनडात भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सुमारे 15 लाख इतकी आहे.
कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, मॅनिटोबा, अल्बर्टा, ओनटेरियो, युकोन आणि सस्कॅचवानमध्ये शिखांचे प्रमाण लक्षणीय आहे. अल्बर्टामध्ये 1 लाख शिखांचे वास्तव्य आहे. तर सस्कॅचवानमध्ये 10 हजार शिख राहतात. ब्रिटिश कोलंबियात सर्वाधिक 2.9 लाख शिख राहत आहेत.