ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाची योग्य विभागणी होणे गरजेचे होते. त्यामुळे पक्षात दोन कार्याध्यक्षपद निर्माण करण्यात आली. खा. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील. अजित पवार यांच्यावर आधीच मोठय़ा जबाबदाऱ्या असल्याने त्यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.
दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. ते म्हणाले, लोकसभेच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी काही राज्य महत्वाची आहेत. निवडणुकीसाठी आमच्या हातात एक वर्षाहून कमी कालावधी असून, आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे कामाची जबाबदारी विविध सहकाऱ्यांवर देणे गरजेचे होते. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सुनील तटकरे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस असतील. त्यांच्याकडे ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये शेती आणि अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना देखील नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्याकडे बिहार, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, कर्नाटकात कामगार विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे आधीच मोठय़ा जबाबदाऱ्या असल्याने त्यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आलेली नाही. ते नाराज असल्याच्या अफवा कोणीही उठवू नये. ते नाराज नाहीत.
23 जूनला पाटणामध्ये विरोधकांची बैठक
येत्या 23 जूनला पाटणामध्ये विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा होईल. कोणत्या राज्यांमध्ये विधानसभा लढवता येईल, याबाबतची चाचपणी केली जाणार आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एकच उमेदवार देण्याची सूचना या बैठकीत मी करणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारला धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे.