अंत्यसंस्कार करण्यास जमीनमालकाचा आक्षेप : दुसऱ्याने स्वत:ची जागा दिल्याने निवळला तणाव
डिचोली : डिचोली मतदारसंघातील मेणकुरे धुमासे पंचायत क्षेत्रातील मेणकुरे या गावात स्थायिक असलेल्या आंदुर्लेकर कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर पारंपरिक जागेत अंत्यसंस्कार करण्यास जागा मालकाने नकार दिल्याने गावात तणावाचे वातवरण निर्माण झाले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मामलेदार, पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. अखेर एकाने आपल्या खासगी जागेत अंतिमसंस्कार करण्याची परवानगी दिल्याने वातावरण निवळले. मेणकुरे गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाही. कोणीही वारल्यास प्रत्येकजण आपल्या खासगी जागेत मृतदेहावर अंतिमसंस्कार करतात. या गावचे महाजन असलेल्या आंदुर्लेकर कुटुंबियांसाठी अशी आरक्षित जागा नाही. एक जागा होती. त्यावर आतापर्यंत या कुटुंबातील कोणीही वारल्यास अंतिमसंस्कार केले जात होते. परंतु सदर जागेवर दावेदारी सांगणाऱ्या व्यक्तीच्या नावावर न्यायालयामार्फत सदर जागा झाल्याने त्या आदेशानुसार संबंधित व्यक्तीने त्या जागेत अंतिमसंस्कार करण्यास मज्जाव केला. त्यामुळे गावातील वातावरण तणावाचे झाले. मामलेदार राजाराम परब, पोलीस निरीक्षक राहुल नाईक पोलीस फौजेसह मेणकुरेत दाखल झाले. गावातीलही लोकही जमले. परंतु जागामालक आपल्या निर्णयाशी ठाम राहिल्याने अंतिमसंस्कार कुठे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला. अखेर एका स्थानिकानेच आपल्या जागेत अंतिमसंस्कार करण्याची परवानगी दिल्याने दुपारनंतर त्या मृतदेहावर अंतिमसंस्कार झाले.
चार सरपंच, तीन आमदार झाले, पण…?
मेणकुरे गावात सार्वजनिक स्मशानभूमी नाही. त्यासाठी आम्ही झगडतच आहोत. गेल्या वीस वर्षांमध्ये चार सरपंच व तीन आमदार होऊन गेले, पण गावात स्मशानभूमी झाली नाही. इतर सर्व कुटुंबियांना जागा आहे, पण आंदुर्लेकर कुटुंबियांना जागा नसल्याने त्यांचा कोणीही वारल्यास त्यांची समस्या होते, असे यावेळी बबन नाईक यांनी सांगितले.
मोठमोठे प्रकल्प, पण स्मशानभूमीकडे दुर्लक्ष
सार्वजनिक स्मशानभूमी ही आज काळाची गरज बनली आहे. ज्या कुटुंबांकडे जागा नाही, त्यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागते. सरकार मोठमोठ्या प्रकल्पांसाठी जागा संपादन करते, कोट्यावधी ऊपये खर्चून प्रकल्प उभारतात. पण स्मशानभूमीसारख्या अत्यावश्यक प्रकल्पासाठी प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी, असे अॅड. संतोष आंदुर्लेकर म्हणाले.
देवस्थान समिती व कोमुनिदादशी बोलणार : सरपंच
मेणकुरे गावातील आंदुर्लेकर कुटुंबासाठी स्मशानभूमीला जागा मिळावी यासाठी 1997 साली आपण पंचसदस्य असताना प्रयत्न करून 100 चौ. मी. जागा मापली होती. पण काही गावातील विघ्नसंतोषी लोकांनी त्यात खो घातला. स्मशानभूमीच्या जागेचा विषय मागे पडला. आता आपण पुन्हा प्रयत्न करणार आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांच्याशीही चर्चा करणार असून गावातील देवस्थान समिती तसेच धुमासे कोमुनिदादकडे जागा देण्यासंबंधी बोलणार आहे, असे सरपंच गुरूदास परब यांनी सांगितले.