पुढील पाच वर्षांसाठी व्हायकॉम 18, जिओ कडे टीव्ही, डिजीटल हक्क : हॉटस्टार, सोनी नेटवर्कच्या पदरी निराशा
वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय क्रिकेट संघाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क मिळविण्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी ई-लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. यामध्ये, रिलायन्स समुहाची कंपनी व्हायकॉम 18 ने भारतीय संघाच्या आंतररष्ट्रीय घरच्या सामन्यांचे टीव्ही आणि डिजीटल प्रसारण हक्क विकत घेतले आहेत. सप्टेंबर 2023 ते मार्च 2028 पर्यंत बीसीसीआयच्या मीडिया राइट्ससाठी आज लिलाव झाला. व्हायकॉम 18 ने सर्वांना पछाडत मीडिया राइट्स मिळवले आहेत. हॉटस्टार, सोनी नेटवर्क यांनीही बोली लावली होती, पण अखेरीस व्हायकॉम 18 ने बाजी मारली. हा करार ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी देशांतर्गत वनडे मालिकेपासून सुरु होईल. भारतीय संघाच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण करण्याचे अधिकार मागील 11 वर्षापासून स्टार स्पोर्ट्सकडे होते. आता व्हायकॉम 18 ने डिजिटल तसेच टीव्हीचे हक्क मिळवले आहेत. व्हायकॉम 18 ने पुढच्या पाच वर्षासाठी डिजिटल तसेच टीव्ही प्रसारणासाठी 5,966.4 कोटी रुपये किंमत मोजली आहे. व्हायकॉमने एका सामन्यासाठी 67.8 कोटी रुपयांची बोली लावली आहे, जी गेल्या वेळेपेक्षा 7.8 कोटी रुपये जास्त आहे. 2018 मध्ये हॉटस्टारने प्रति सामना 60 कोटी रुपयांच्या हिशोबाने मीडिया राइट्स मिळवले होते. पण यावेळी टेंडरसाठी कंपन्यांनी रस न दाखवल्यामुळे प्रति सामना किंमत कमी केली होती. यंदा प्रति सामना 45 कोटी इतके शुल्क ठेवण्यात आले होते. यामध्ये रिलायन्सच्या व्हायकॉमने बाजी मारली.
पुढील पाच वर्षे क्रिकेट जिओ सिनेमावर
सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या वनडे मालिकेपासून सुरु होणाऱ्या या करारात व्हायकॉम 18 ला पुढील 5 वर्षांत भारतीय संघाचे 88 आंतरराष्ट्रीय सामने दाखवण्याची संधी मिळणार आहे. हा करार मार्च 2028 मध्ये संपेल. आता भारतीय संघाच्या घरच्या सामन्याचे डिजीटल लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर केले जाईल. तर टिव्ही प्रसारण स्पोर्टस 18 या चॅनेलवर केले जाईल. पुढील 5 वर्षांसाठी बीसीसीआय कडून मीडिया अधिकार संपादन केल्यामुळे, व्हायकॉम 18 ला आता अनेक क्रीडा स्पर्धांचे प्रसारण करण्याचे अधिकार मिळाले आहेत. यात आयपीएलचे डिजिटल प्रसारण अधिकार, टीव्ही आणि महिला प्रीमियर लीगचे डिजिटल अधिकार, 2024 पासून भारतात दक्षिण आफ्रिकेच्या घरच्या सामन्यांचे प्रसारण हक्क, रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज, दक्षिण आफ्रिका टी-20 असे अनेक प्रकारच्या खेळांचे अधिकार आता व्हायकॉमकडे असणार आहेत.
मीडिया हक्क
आयसीसीचे सामने (2024-2027)
टीव्ही- झी/सोनी, डिजीटल- हॉटस्टार.
भारताचे मायदेशातील सामने (2023-2028)
टीव्ही – स्पोर्ट्स 18, डिजीटल-जिओ सिनेमा
आयपीएल (2023-28)
टीव्ही – स्टार स्पोर्ट्स, डिजीटल-जिओ सिनेमा.