पुणे / वार्ताहर :
जागेचा एन.ए. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 42 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी शिरुरचे तत्कालीन तहसीलदार, महसूल सहायक आणि तलाठय़ासह एकूण पाच जणांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीची पडताळणी करुन कारवाई केली.
रंजना उमेश उमरहांडे (तात्कालीन तहसीलदार, शिरुर), स्वाती सुभाष शिंदे (महसूल सहायक, शिरुर), सरफराज तुराब देशमुख (तलाठी, मौजे शिरुर), अतुल घाडगे आणि निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या ट्रस्टच्या जागेचा एन. ए. प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तलाठी देशमुख यांनी स्वत:साठी आणि वरिष्ठांसाठी 42 लाखाच्या लाचेची मागणी केली होती. यामध्ये मदत करण्यासाठी स्वाती शिंदे यांनी एक लाख, प्रस्ताव पुढे पाठवण्यासाठी रंजना उमरहांडे यांनी पाच लाख आणि दोघा खासगी व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रस्ताव मंजूर करुन देण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा दाखल करुन तलाठी सरफराज देशमुख याला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत.
अधिक वाचा : राज्यात थंडी कमी; उकाडा कायम