प्रतिनिधी/ सातारा
माण तालुक्यातील पिंगळी फाटा येथे सापळा लावून घरफोडी व चोरीच्या गुह्यातील माल घेऊन जाणाऱ्या चार रेकॉर्ड वरील गुन्हेगारांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाख 45 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अमर बापूसाहेब देवगुडे(वय 26, रा. खोकडवाडी ता. सातारा), संतोष शामराव सोनटक्के(वय 25, भांडवली ता. माण), विनोद निवृत्ती खरात(वय 25, रा. एमआयडीसी सातारा), शशांक दिपक जाधव(वय 21, रा. खोकडवाडी ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केले. हे पथक दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, दहिवडी वरून सातारच्या दिशेने अशोक लेलंड टेम्पो (क्रं. एमएच 11 डी डी 2334) व मारूती अल्टो कार(क्रं. एमएच 04 डि जे 4115) मधून चोरीचा माल घेऊन काही इसम येत आहेत. या माहितीच्या आधारे पोउनि पाटील व पोलीस अंमलदार यांनी पिंगळी फाटा(ता. माण) येथे सापळा लावून वाहने पकडली. यावेळी रेकार्डवरील गुन्हेगार अमर देवगुडे, संतोष सोनटक्के, विनोद खरात, शशांक जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जनरेटर, फ्रिज, संगणक, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मुर्त्या, एल.सी.डी टीव्ही, पिठाची चक्की, सिलेंडर, उसाचे गुराळ, मोपेड मोटार सायकल, टेम्पो व अल्टो कार असा एकुन 10 लाख 45 हजार 250 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड
या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेला रहिमतपूर पोलीस ठाणे, औंध पोलीस ठाणे, दहिवडी पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाणे, पुसेगांव पोलीस ठाणे, चिपळून पोलीस ठाणे येथे 4 घरफोडीचे व 2 चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.