सामानांचे दर मात्र स्थिर, सुक्या मासळीला मोठी मागणी
रविराज च्यारी : जून महिना सुरू म्हणजे पावसाच्या आगमनची चाहूल देणारा महिना. बुधवार दि. 31 मे हा या उन्हाळी मोसमातील अखेरचा दिवस होता. या अखेरच्या दिवशी डिचोली आठवडा बजारात बेगमीच्या वस्तू खरेदीसाठी लोकांची मोठी झुंबड पहायला मिळाली. अखेरच्या दिवसांमध्ये बेगमीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत काही प्रमाणात घट झालेली दिसून आली. कडक उन्हाळ्यात होरपळ होत असतानाही लोकांकडून बाजारात बेगमीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी असतेच. यावर्षी पावसानेही या वस्तू तयार करणाऱ्या कष्टकरी लोकांवर चांगलीच कृपादृष्टी दाखवली. उन्हाळ्यात सुकविण्यात येणाऱ्या या वस्तूंना पावसाचा यावर्षी मोठा व्यत्यय आला नाही. त्यामुळे यावर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्व आठवडा बाजारांमध्ये सर्व बेगमीच्या वस्तू लोकांसाठी उपलब्ध होत्या.
लाल मिरची खरेदीकडे जास्त कल
बेगमीत गोवेकरांना सर्वप्रथम आतुरता असते ती लाल मिरची खरेदीची. यावेळी सर्व भागांमध्ये लाल मिरचीचे पीक चांगल्या प्रमाणात आल्याने हे मिरची पीक घेणारे शेतकरी समाधानी होते. परंतु त्यांच्या हातचा व्यवसाय परप्रांतीय लाल मिरची विक्रेत्यांनी काही प्रमाणात पळविला. डिचोली बाजारात विशेष करून मये भागातील मिरचीला मोठी मागणी असते. सध्या ही मिरची 550 ते 600 ऊपये प्रती किलो प्रमाणे विक्रीस उपलब्ध होती. जास्त प्रमाणात मिरची घेतल्यास मूळ दरातील 50 ते 100 ऊपये कमी केले जात होते. तर जांबोटी मिरची ही कालच्या बाजारात 350 ते 300 ऊपये किलो या दराने विकली जात होती. तसेच गोव्यातील मेणकुरे, इब्रामपूर, हरमल, काणकोण भागातीलही मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती.
सुकी मासळी खरेदीसाठी गोवेकरांची पसंती
गोमंतकीय म्हटल्यावर ते मत्स्यवेडे लोक. आठवड्यातील ठराविक दिवस शाकाहार पाळणाऱ्या गोमंतकीयांच्या ताटात इतर दिवशी मासे हे आवश्यक असते. पावसाळ्यात राज्यामधील समुद्रात दोन महिने मासेमारी बंदी काळ असल्याने ताजे मासे मिळत नाही. व बाजारात येण्राया मासळीचा दरही गगनाला भिडलेला असतो. त्यासाठी या दिवसांमध्ये लोकांना सुक्या मासळीचाच मोठा आधार असतो. डिचोलीत काल बुधवारी मोठ्या संख्येने लोकांनी सुक्या मासळीची खरेदी केली. बाजारात मोठे बांगडे 100 रूपयांना 5, मध्यम बांगडे 100 रूपयांना 10, बारीक बांगडे 100 रू. वाटा, सुकी कोळंबी 150 रू. पड, गालमो 100 रू. पड, बारीक कोळंबी 100 रू. पड, सुकी पेडी, तारले यांचे वाटे रू. 100 प्रमाणे होते. भोक्शे 100 रू. पड अशा दराने सुक्या मासळीची विक्री होत होती.
सुक्या मासळीलाही बिगर गोमंतकीयांचे ग्रहण
लाल मिरचीला ज्या प्रकारे सध्या गोव्यात परप्रांतीय मिरचीचे ग्रहण लागले आहे. त्याचप्रमाणे गोमंतकीय सुक्या मासळीलाही बिगर गोमंतकीय विक्रेत्यांचे ग्रहण लागले आहे. या व्यवसायात पूर्वी गोमंतकीय मासेविक्रेत्याच पहायला मिळत होत्या, व त्यांचा व्यवसाय चांगला व्हायचा. परंतु, आता या व्यवसायात बिगर गोमंतकीय विक्रेते घुसले आहेत. या विक्रेत्यांची उपस्थिती मोठी असल्या कारणाने स्थानिक मासेविक्रेत्यांच्या हातचा व्यवसाय कमी होत चालला आहे. अशी खंत काही मासेविकेत्यांनी व्यक्त केली.
आमसुले, हळसांदे, चवळी, चिंच, कोकम आगळलाही मोठी मागणी
लाल मिरची व सुक्या मासळीबरोबरच या बाजारात गवठी उकडा तांदूळ, नाचणे, हळसांदे, चवळी, आमसुले यांचीही आवक मोठी होती. कोकमच्या आमसुले व आगळाला मोठी मागणी असते. बाजारात कोकमची आमसुले 150 प्रती पड तर कोओकमचा आगळ 200 रु. लीटर प्रमाणे होता. आंब्याची आमसुले रु. 250 प्रती पड, हळसांदे 250 रु. पड, चवळी 150 रु. पड, नाचणे 60 रु. पड या दराने विक्रीला होते. या वस्तूंना मोठी मागणी होती व लोकांनीही मोठी खरेदी केली.
पावसाळी चपले, आच्छादने, छत्र्यांचीही खरेदी
बाजारात पावसाळी चप्पले, छत्र्याही उपलब्ध झाल्या होत्या. याही सामानांची मोठी खरेदी बाजारात झाली. घरांवर, घरांच्या बाहेर पावसापासून संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या प्लास्टिक ताडपत्रीची अच्छादने लोकांनी खरेदी केली.