देखावे-गणेशमूर्ती पाहण्यासाठी उत्साह, पावसामुळे काहीसा हिरमोड
बेळगाव : बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघेच काही तास शिल्लक राहिल्याने देखावे पाहण्यासाठी शहर व परिसरात तुफान गर्दी झाली. ग्रामीण भागातील गणेशभक्त वाहने करून गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावत होते. नावीन्यपूर्ण व समाजप्रबोधन करणारे देखावे साकारल्याने मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गणेशभक्तांचा उत्साह टिकून होता. यावर्षी गणेशोत्सव 10 दिवस आल्याने मंडळांना तयारीसाठी कमी दिवस मिळाले. मंडपात गणेशमूर्ती दाखल झाल्यानंतर देखाव्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शनिवारपर्यंत गणेशभक्तांना देखाव्यांची वाट पहावी लागली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी महिलांवरील अत्याचार, व्यसनांच्या आहारी गेलेली पिढी असे सामाजिक देखावे मांडण्यात आले आहेत. त्याचबरोबर केदारनाथ मंदिर, राजवाडे, कुस्ती आखाडा, सर्कस असे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. मंगळवारी बाजारपेठ बंद असल्याने सायंकाळी 6 वाजल्यापासूनच गणेशदर्शनासाठी गर्दी होऊ लागली. शहरातील मुख्य भागासह वडगाव, शहापूर, अनगोळ, टिळकवाडी, शिवाजीनगर, गांधीनगर आदी भागांमध्ये गर्दी दिसून आली. चटपटीत खाद्यपदार्थ, आईस्क्रिम, स्वीटकॉर्न, शेंगा, वडापाव, गोबीमंचुरीचे स्टॉल रात्रीपर्यंत सुरू होते.
वाहतूक कोंडीचा सामना
मंगळवारी मोठ्या प्रमाणात गणेशभक्त देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले होते. बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. गणरायाच्या विसर्जनासाठी एकच दिवस राहिल्याने गर्दीने उच्चांक गाठला होता. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी झाली होती. विशेषत: गणपत गल्ली, नरगुंदकर भावे चौक, शनिवार खूट, शनिमंदिर, कपिलेश्वर मंदिर परिसरात वाहतूक कोंडी होत होती.