आंबोली-सुंडी-तिलारी धबधब्यांच्या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावर रविवारी महाराष्ट्रमधील आंबोली, सुंडी व तिलारी अशा धबधब्यांच्या ठिकाणी पोहचण्यासाठी बेळगाव शहराकडून जाणाऱ्या अनेकांनी गर्दी केल्याने अक्षरश: अनेक ठिकाणी या मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. रविवार सुटीचा दिवस असल्याने पहाटेपासूनच अनेक युवक, युवती याचबरोबर दुचाकी व चारचाकी, टेम्पो, वडाप वाहनांतून मोठ्या संख्येने नागरिक धबधब्यांच्या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी जात असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. अनेक गावे बेळगाव-वेंगुर्ले मार्गालगतच आहेत. विजयनगर, हिंडलगा, सुळगा, तुरमुरी, शिनोळी, कार्वे अशी गावे रोडलगत असल्याने या गावांच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. यामध्ये अनेक युवक, युवतींचाच भरणा अधिक असल्याचे दिसून येत होते.
युवक-युवतींचे दुचाकी चालवणे बेफाम
सदर युवक, युवती दुचाकी गाड्या बेफामपणे चालवत होत्या. त्यांच्या वेगावर नियंत्रणच नसल्याने अनेक ठिकाणी तक्रारीच्या किरकोळ घटनाही घडत असल्याचे दिसून आले. तसेच वाहने हाकताना वेगवेगळे आवाज काढणे, ये-जा करणाऱ्यांची टिंगल-टवाळी करणे, असे प्रकारही सर्रास दिसून येत होते. हे युवक आपली वाहने कशीही चालवत असल्याचे निदर्शनास येत होते.
कर्नाटक-महाराष्ट्र पोलिसांनी यावर आळा घालावा
कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील पोलीस खात्याने यावरती आळा घालावा. वेगावरती नियंत्रण आणावे, अन्यथा मोठे अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही. यापूर्वी या मार्गावरती असे अपघात होऊन अनेकांचे नाहक बळीही गेले आहेत. मात्र चूक नसलेल्या नागरिकांना नाहक अपघातांचा सामना करावा लागतो व जीव गमावण्याची वेळ येते. यासाठी शासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात व या रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत व्हावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.