ऑनलाईन टीम / रायपूर :
छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील निमलष्करी छावणीत सीआरपीएफच्या एका जवानाने आपल्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. या घटनेत एक जवान शहीद झाला असून, दुसरा जवान जखमी झाला आहे. गोळीबार करणाऱ्या जवनानेही स्वतःवर गोळी झाडली. या जवानाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी 8 वाजता सीआरपीएफच्या 241 बटालियनच्या छावणीत ही घटना घडली.
गिरीशकुमार (वय 25) असे गोळीबार करणाऱ्या जवानाचे नाव आहे. सेसरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेडवा गावातील 241 बटालियनच्या छावणीत गोळीबार करणाऱ्या जवानावर मानसिक आजारांवर उपचार सुरू होते. आज सकाळी या जवानाने आपल्या सहकाऱ्याकडून रायफल हिसकावून घेतली आणि दोन जवानांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.