सर्वात लहान मुल घराबाहेर पडल्यावर एकामागोमाग एक प्रश्न विचारत असते. या आकाशाचा रंग निळाच का? हे आकाश कुठपर्यंत आहे? झाडाच्या पानांचा रंग हिरवाच का? या झाडाचे हे पान पिवळे का आहे? शेजारच्या काकुला बाळ झालं म्हणजे कुणी दिलं? या अंड्यात कोंबडीचं पिल्लू आहे का? ढगात पाणी कुठून येते? असे असंख्य प्रश्न विचारणारी मुले वय वाढल्यानंतर प्रश्न विचारणे हळूहळू बंद करतात. याला कारण त्यांच्या प्रश्नावर जवळपासचे लोक हसतात आणि दुसरे कारण पालक प्रश्नांची नीट वेळ काढून उत्तरे देत नाहीत.
गणपती ही बुद्धीची देवता आहे परंतु याच उत्सवाच्या काळामध्ये बुद्धीचा वापर न केल्याची उदाहरणे आपण आसपास बघत असतो. काही गोष्टी परंपरेने चालत आलेल्या असतात परंतु बदलत्या काळामध्ये त्यावर मोठी माणसे विचार करत नाहीत. गणपतीची पूजा बाबांनीच का करायची, सर्व तयारी करून देणाऱ्या आईने का नाही, हा प्रश्न मुलांना पडतो, परंतु त्याचे समाधानकारक उत्तर पालक देत नाहीत. आई-वडिलांना प्रश्न विचारण्याचे कुतूहल नसेल तर त्यांच्या मुला-मुलींमध्ये कुठून येणार? अनेक शब्दप्रयोग आपण रोजच्या बोलण्यामध्ये वापरतो पण त्याचा अर्थ जाणून घेण्याची उत्सुकता नसते. ‘धोबी का कुतका, न घर का न घाट का’ याचा नेमका उगम लक्षात न घेतल्यामुळे त्याचा अपभ्रंश झाला आणि ‘कुतका’ चा ‘कुत्ता’ झाला. तरीही कुतूहलाअभावी आपण तो शब्दप्रयोग तसाच वापरत राहिलो. वर्षानुवर्षे आपण जे ऐकत आलो, जे करत आलो त्यावर प्रश्न विचारल्यामुळे कुतूहल असण्याची वृत्ती अंगी रुळते. परंपरेने चालत आले ते आताही विचार न करता तसेच सुरु ठेवणे आपल्याच अधोगतीचे कारण बनते.
‘निसर्गाची किमया’ असे काही बघितल्यावर आपण ‘नतमस्तक होणे’ वगैरे प्रतिक्रिया देतो. जिथे आपण नतमस्तक होऊन नमस्कार वगैरे करतो, तिथे डोके चालवणे, प्रश्न विचारणे थांबते. ‘देवाची करणी आणि नारळात पाणी’ अशी वृत्ती असू नये, नारळात पाणी का असते याचा विचार करावा, फुलपाखरे वेगवेगळा रंग कसा धारण करतात, पक्षी एका खंडामधून दुसऱ्या खंडात प्रवास कसा करतात, असे अनेक प्रश्न कुतूहलापोटी विचारावेत आणि त्याची उत्तरे मिळवण्यासाठी प्रयत्न करत रहावे. फ्लेमिंगो याच तळ्यावर का थांबतात, थंडीमध्येच का येतात, त्या फ्लेमिंगोच्या पायांचा रंग वेगळा का आहे? असे असंख्य प्रश्न विचारले तरच माणूस या नात्याने आपली प्रगती होईल. पक्ष्यांचा थवा उडताना ठराविक इंग्रजी व्ही आकाराने उडतो याचे कारण असे केल्यामुळे त्यांना कमीतकमी शक्तीचा वापर करून जास्तीत जास्त अंतर कापता येते. थोडे अंतर गेल्यानंतर सर्वात पुढे असणारा पक्षी मागे जातो आणि दुसरा पक्षी नेतृत्व करतो. पुढे असणाऱ्या पक्ष्याची सर्वात जास्त शक्ती खर्च होत असल्यामुळे पक्षी ती जबाबदारी वाटून घेतात. परंतु जोपर्यंत पक्षी असे का उडतात हा प्रश्न पडत नाही, तोपर्यंत याचे उत्तर शोधण्याची वृत्ती आपल्यात येणार नाही.
ब्राऊन ब्रेड हा खरेच आरोग्यास चांगला असतो? ब्राऊन ब्रेडमध्ये गहू असतो की ब्राऊन रंग असतो? चंद्रोदय आणि उपवास सोडणे याचा संबंध काय? चंद्रोदय होतो म्हणजे नेमके काय होते? उपवासाला शेंगदाणे चालतात तर शेंगतेल का चालत नाही? हरितालिकेचा उपवास चांगला नवरा मिळण्यासाठी करायचा असल्यास लग्नानंतर तो उपवास करण्याचे स्त्रिया का थांबवत नाहीत? असा उपवास पुरुषांसाठी का नाही? मोठ्या आवाजाचा गणपतीला त्रास होतो की नाही? नदीमध्ये निर्माल्य म्हणजेच फुलांचा कचरा टाकल्यामुळे देव का रागावत नाही? आपल्या घरामध्ये पाणी कोठून येते? विकत घेतलेले पाणी शुद्ध असते का? असे अनेक प्रश्न लहान मुलांच्या मनात असतात पण असे प्रश्न बेधडकपणे विचारण्याची मुभा प्रत्येक घरात असते का?
असे प्रश्न पडता पडता शाळेत प्रवेश घेतला जातो. तिथे कोणताही प्रश्न सर्वांसमोर शिक्षकांना विचारण्याची अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना भीती वाटते. अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडणाऱ्या बालकाने शाळेमध्ये गेल्यावर प्रश्न विचारायचे बंद केले असेल तर दोष शिक्षण व्यवस्थेचा आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाइन यांनी म्हटले आहे, “िंdल्म्atग्दह ग्s हदू tप तहग्हु द aिम्ts, ंल्t tप traग्हग्हु द स्ग्हे् tद tप्ग्हक्”. त्यांचेच आणखी एक वाक्य तितकेच महत्त्वाचे आहे, “माझ्याकडे विशेष बुद्धी नाही, मी फक्त जिज्ञासू असण्याचा ध्यास घेतला आहे. जिज्ञासू असणे म्हणजे परंपरागत मिळालेल्या उत्तरांची सत्यासत्यता पडताळून पाहणे. ‘आकाशात चंद्र किती?’ या प्रश्नाचे उत्तर एक असे पहिली-दुसरीमधला विद्यार्थी देऊ शकतो परंतु इयत्ता वाढताच अनेक ग्रह समजतात त्यामुळे चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे हे आपण शिकतो. आपल्या सूर्यमालेत अनेक ग्रहांना उपग्रह आहेत. त्यामुळे या सूर्यमालेत 294 चंद्र आहेत असे उत्तर आत्ता देता येईल. आणखी काही वर्षांनी कदाचित अधिक काही चंद्र असल्याचे अभ्यासाअंती समजू शकेल. आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे अनेक सूर्यमाला आहेत त्यातील ग्रहांना अनेक उपग्रह असतील, ज्याची गणना करावी लागेल. दहावीमध्ये प्रवेश घेतल्यावरही आकाशात एकच चंद्र असे उत्तर येत असेल तर त्या विद्यार्थी/विद्यार्थिनीने विज्ञानाचे शिक्षण घेण्याचा विचार करू नये.
शाळांमध्ये प्रश्न विचारण्यास उद्युक्त केले जात नाहीच शिवाय शिक्षकांकडून जे प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे प्रश्नांमध्येच असतात. “समजला का धडा?”, या प्रश्नावर “हो” असेच अपेक्षित असते. “आजपासून वाचणार ना पुस्तक?” या प्रश्नावर “नाही” असे कोणी म्हणणार नाही, अशाच पद्धतीने सूचक प्रश्न विचारले जातात. अनेक प्रश्न विचारून मुलांकडून उत्तर काढून घेतले तरंच मुलांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित होते. तांदूळ मीठ चुकून एकत्र झाल्यास दोन्ही वेगवेगळे कसे करणार? असा प्रश्न विचारावा. त्याची अनेक उत्तरे विद्यार्थ्यांनी सांगावीत आणि कोणताही सूचक प्रश्न न विचारता शिक्षकांनी मुलांना उत्तरापर्यंत घेऊन जावे. अर्थात अशी वेळखाऊ प्रक्रिया करण्यास फार कमी शिक्षक उत्सुक असतात. त्यामुळे अशा अनेक उत्तरांच्या शक्यता पडताळून बघता बघता शिकण्याची प्रक्रिया घरी करून बघण्याचे प्रयोग पालकांना करता येतील.
कुतूहल असणे ही एक सवय असते. एकामागोमाग एक प्रश्न विचारून आणि त्याची उत्तरे वाचन-चिंतन-मनन-त्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व्यक्तींशी चर्चा करून ही वृत्ती अंगी बाणवता येते. आज सोशल मीडियावर फॉरवर्ड होत आपल्यापर्यंत काहीही पोहोचत असते. सहसा माहिती आणि ज्ञान यामध्ये गल्लत केली जाते. ज्या घरामध्ये आई-वडील प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणारे असतात, गुरूला, शिक्षकांना, व्यवस्थेला, पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतात, त्याची शहानिशा करतात, त्यांची मुले-मुली घरामध्ये प्रश्न विचारतात, त्यांचे कुतूहल जागृत असते. दही एका रात्रीमध्ये तयार होते तेव्हा त्या आठ तासात काय प्रक्रिया होते, दह्यामधले बॅक्टेरिया उपवासाला कसे चालतात, उपवास म्हणजे काय, असे असंख्य प्रश्न विचारणारी पुढची पिढी तयार झाली तरंच आपण आपल्या मुलांना खरे शिक्षण दिले, असे पालक अभिमानाने सांगू शकतील. निव्वळ कोणत्याही क्लासला नाव नोंदवल्यामुळे तो विषय/ती कला शिकता येणार नाही. तिथेही निरंतर प्रश्न विचारण्याची, अन्य प्रश्नांची उत्तरे वाचनामधून मिळवण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. आर्टिफिशीयल इंटेलीजन्सच्या जमान्यात प्रश्न विचारण्याचे कौशल्य अंगी बाणवणे काळाची गरज आहे. कुतूहलापोटी प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे शोधण्याची चटक घरामधील प्रत्येकास लागणे म्हणजेच बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करणे.
सुहास किर्लोस्कर