बीएसएनएल कार्यालय परिसरातील प्रकार
बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वत्र वृक्षारोपणाचे कार्यक्रम होत असताना दुसरीकडे मात्र शहरात वृक्षतोड होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कॅम्प येथील बीएसएनएल कार्यालय परिसरात हा प्रकार घडला आहे. मोठे वृक्ष तोडले जात असून यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी हटकले असता वृक्षतोड करणाऱ्यांकडे कोणतेही उत्तर नव्हते. या सर्व प्रकारामुळे वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. शहरात मागील वर्षभरात अनेक ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. यामध्ये सरकारी कार्यालये व महामार्ग प्राधिकरण सर्वात पुढे आहे. स्मार्ट सिटीनेही शहरातील अनेक जुन्या वृक्षांची तोड करून बेळगावचा परिसर भकास केला. त्यातच आता कॅम्प येथील बीएसएनएल कार्यालयातील वृक्षतोडीमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. पर्यावरण दिनादिवशीच झाडांवर घाला घातल्याने वृक्षप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली नाहीत.