वृत्तसंस्था/ चेन्नई
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या चेन्नई महिलांच्या खुल्या टेनिस स्पर्धेत झेकची महिला टेनिसपटू लिंडा प्रुहव्हर्टोवाने एकेरीचे जेतेपद मिळविताना तृतीय मानांकित मॅग्डा लिनेटचा पराभव केला.
रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात लिंडाने लिनेटचा 4-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा अंतिम सामना 2 तास 40 मिनिटे चालला होता. डब्ल्यूटीए टूरवरील स्पर्धेतील लिंडाचे हे पहिलेच विजेतेपद आहे. या अंतिम सामन्यात लिंडाने पहिला सेट गमाविल्यानंतर तिने आपल्या अचूक सर्व्हिसवर तसेच बेसलाईन खेळावर अधिक भर देत पुढील दोन सेट्स जिंकून विजेतेपद हस्तगत केले.
महिला दुहेरीत अग्रामानांकित कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोवस्की व ब्राझीलची लुइसा स्टेफानी यांनी जेतेपद पटकावताना रशियाची ऍना ब्लिन्कोव्हा व जॉर्जियाची नातेला झालामाईझचा 6-1, 6-2 असा सहज पराभव केला. त्यांचे हे तिसरे डब्ल्यूएटी अजिंक्यपद आहे.