बेंगळूर येथील सीमा निर्णय आयोग कार्यालयात होणार सुनावणी; आवश्यक तयारी पूर्ण
बेळगाव : जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचना सीमा व सदस्य संख्या निश्चित करण्यासंदर्भात सीमा निर्णय आयोगाकडून अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यावर दि. 19 पर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आक्षेपांवर दि. 3 ऑक्टोबर रोजी बेंगळूर येथे सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. यामध्ये जिल्हा पंचायत व तालुका पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष लागून आहे. नुकताच जिल्हा पंचायत व तालुका पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेसंदर्भातील अहवाल जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच सदस्य संख्याही जाहीर करण्यात आली आहे. सीमा निर्णय आयोगाकडून जाहीर केलेल्या अहवालावर आक्षेप मागविण्यात आले होते. त्या आक्षेपांवर सुनावणी करण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातून नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांवर बेंगळूर येथे पंचायतराज सीमा निर्णय आयोगाच्या कार्यालयात दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.30 पर्यंत सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर सादर करण्यात आलेले पुनर्रचित मतदारसंघ व सदस्य संख्या निश्चित केली जाणार आहे. यानंतरच निवडणुकीसंदर्भात निर्णय होणार आहे, असे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असून यावरही तोडगा निघणे आवश्यक आहे. न्यायालयातील प्रकरण निकालात लागल्यानंतरच मतदारसंघानुसार आरक्षण जाहीर केले जाणार आहे. या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार आहे. निवडणूक विभागाकडून आवश्यक तयारी करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. सीमा निर्णय आयोगाकडून मागविण्यात आलेले आक्षेप बेंगळूर येथील कार्यालयात ऑनलाईनद्वारे नोंदविण्यात आले आहेत. किती जणांनी आक्षेप नोंदविले याबाबत अधिकृत माहिती सदर कार्यालयातून उपलब्ध होऊ शकते. याबाबत स्थानिक पातळीवर माहिती उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.