आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. शशी बाला यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
विश्वभरात ज्या काही समस्या आहेत. त्याचे उत्तर हे अध्यात्मातून मिळू शकते. या दृष्टीनेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातर्फे शनिवार दि. 27 रोजी सकाळी 10 वा. ते सायं. 5 वाजेपर्यंत विविधता, सर्वसमावेशकता व परस्पर आदर या विषयावर आंतरराष्ट्रीय जी-20च्या अंतर्गत असलेली सी-20परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषद राजहंस नौदल सभागृह दाबोळी येथे होणार असून सी20 परिषदेचे आयोजन गोवा सरकार, महर्षि विश्वविद्यालय, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज आणि भारतीय विद्याभवन नवीदिल्ली या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने होणार असल्याची माहिती सी-20च्या आंतरराष्ट्रीय समन्वयक प्रा. डॉ. शशी बाला यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन समन्वयक श्वेता क्लार्क आणि डॉ. अमृता देशमाने उपस्थित होत्या.
परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे उपस्थित राहणार आहेत. सी-20च्या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माता अमृतानंदमयी मठाच्या संस्थापिका प.पू माता अमृतानंदमयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सी20च्या अंतर्गत आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, तंत्रज्ञान, पारंपारिक कला, संस्कृतीचे जतन आणि संवर्धन आदी 14 प्रकारचे विविध गट कार्यरत आहेत. परिषदेत सीन क्लार्क, अजित पद्मनाभ,पॅ. दिलीप दोंडे, डॉ. निशी भट, वृंदा खन्ना, हन्स मार्टिन हिअरलिंग, गोवा प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष महेश पाटील, सौरभ खन्ना, महेश त्रिपाठी, अभिनेत्री पूजा बेदी, धेंपो कॉलेजचे प्राचार्य प्रो.मनोज कामत हे वक्ते विविध विषय मांडणार असल्याची माहिती डॉ. शशी बाला यांनी दिली.