वृत्तसंस्था / नवी दिल्ली
गतकाळातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्या वहीदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केली. वहीदा रहमान या 85 वर्षांच्या असून त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले होते.
त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्यासा, सीआयडी, गाईड, कागज के फूल, खामोशी आणि त्रिशूल यांचा विशेषत्वाने समावेश होतो. त्यांच्या देदिप्यमान अभिनय कार्यकाळाचा सन्मान करण्यासाठी दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. हा पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो.
1955 मध्ये पदार्पण
वहीदा रहमान यांनी 1955 मध्ये रोजुलू मराई आणि जयसिम्हा या दोन तेलगु चित्रपटांमधून आपल्या अभिनय कार्यकाळाचा प्रारंभ केला होता. तो काळ कृष्ण-धवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपटांचा होता. त्यांनी देवानंद निर्मित सीआयडी या चित्रपटातून 1956 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांचा अभिनय कालखंड तब्बल पाच दशकांचा होता. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना 1971 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. 2021 मध्ये त्यांनी ‘स्केटर गर्ल’ या क्रिडासंबंधित चित्रपटात शेवटची भूमिका केली होती. त्यानंतर त्या चित्रपटक्षेत्रापासून दूर होत्या. 2005 नंतर त्यांच्या चित्रपटांची संख्या कमी होत गेली होती. त्या चरित्र भूमिकाही उत्तम रितीने सादर करीत होत्या. तारुण्यात देव आनंदसमवेत त्यांनी अनेक गाजलेले चित्रपट दिले.
समाजकार्यातही आघाडीवर
प्रौढ आणि वृद्ध वयात त्यानी चित्रपटांसमवेत समाजकार्याती मोठा रस घेतला होता. अनेक संस्थांना त्यांनी उदारहस्ते देणग्या देऊन सहाय्य केले आहे. केंद्र सरकारने नुकतेच महिला आरक्षण विधेयक संसदेत संमत केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासारख्या अभिनय क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेल्या महिलेचा या पुरस्काराने गौरव होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे, असे अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या सोशल मिडियावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे.