असोगा परिसरातही गव्यांच्या कळपाकडून गेल्या महिन्याभरापासून उच्छाद : वनखात्याने बंदोबस्त करण्याची मागणी
वार्ताहर /नंदगड
खानापूर तालुक्मयातील पश्चिम व दक्षिण भाग डोंगराळ भागात मोडतो. या भागातील शेतवडीत प्रामुख्याने भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. ऐन सुगीच्या वेळेला जंगली जनावरे उभ्या पिकात घुसून खाऊन तुडवून नुकसान करत आहेत. खानापूरपासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या असोगा परिसरातही गव्यांच्या कळपाकडून गेल्या महिन्याभरापासून उच्छाद मांडला आहे. त्यामुळे तालुक्मयातील अन्य शेतकऱ्यांबरोबरच असोगा परिसरातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम दक्षिण भागात जंगल असले तरी पूर्वी जंगली प्राणी पिकात घुसत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होत नव्हते. गेल्या पंचवीस वर्षात भात पिकाचे रक्षण करताना जंगली जनावरांच्या आक्रमणामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. तर काहीजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरवषी हीच परिस्थिती होत असल्याने काही शेतकऱ्यांनी जमिनीत उत्पादन घेण्याचे कमी केले होते. यावषी मात्र पावसाने ओढ दिल्याने उत्पादनात बऱ्याच प्रमाणात घट झाली आहे. ही जरी नैसर्गिक समस्या असली तरी उरले सुरले उत्पादन तरी घ्यावे, ही धडपड शेतकऱ्यांमध्ये सुरू असतानाच जंगली जनावरांकडून पिकावर होत असलेले आक्रमण पाहता यापुढे शेती करणे कठीण होऊन बसले आहे. जंगली जनावरे जंगलातच राहावीत, त्यांचा पाणी पिण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वनखात्याने ठिकठिकाणी तलावाची निर्मिती केली आहे. परंतु अन्नाच्या शोधात जंगली जनावरे जंगलांना लागून असलेल्या शेतवडीत घुसत आहेत. भात व ऊस पिकाचे नुकसान त्यांच्याकडून केले जात आहे. सरकारकडून पिकाची नुकसानभरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांकडून वनखात्याच्या अंतर्गत नुकसान भरपाईचा अर्ज सादर केला जातो. परंतु नुकसानभरपाईपेक्षा कित्येक पट कमी नुकसानभरपाई मिळते. त्यासाठी लहान लहान शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान झाले असले तरी नुकसानभरपाईसाठी अर्ज करणेही टाळले आहे.
उसाचे नुकसानही सुरूच
खानापूरची जीवनदायीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलप्रभा नदीच्या काठावरील जमिनीत व ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बोअरवेल मारलेल्या आहेत अशा जमिनीत आर्थिक स्थैर्य मिळवून देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊस पिकाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. अलीकडे जंगली प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या वेळी गवे, डुक्कर व अन्य काही जंगली प्राणी ऊस पिकात घुसून खाऊन तुडवून नुकसान करत आहेत. एकाचवेळी कळपाने जंगली जनावरे पिकात घुसत असल्याने राखण करणारा शेतकरीही घाबरून जात आहे. त्यामुळे जनावरांचे फावले असून रोजच ठिकठिकाणी ऊस पिकाचे जंगली जनावरांकडून नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहेत.