वर्ष उलटले तरी भरपाई नाही : पशुसंगोपन खात्याचे दुर्लक्ष
बेळगाव : गतवर्षी ‘लम्पी’ जीवघेण्या रोगाने पशुपालकांची जनावरे दगावली आहेत. मात्र एक वर्ष उलटले तरी अद्याप शेवटच्या टप्प्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना भरपाई मिळाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालकांवर पशुसंगोपन खात्याच्या पायऱ्या झिजव्यावा लागत आहेत. त्यामुळे आता नवीन सरकार अन् पशुसंगोपन खाते भरपाई देणार काय असा प्रश्न नुकसानग्रस्त पशुपालकांना पडला आहे. गतवर्षी ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात ‘लम्पी’ विषाणूजन्य रोगाचा शिरकाव झाला होता. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र रोगाचा फैलाव वाढला होता. परिणामी 30 हजार हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडली होती. तर लाखो जनावरांना बाधा झाली होती. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. पहिल्या टप्यातील नुकसानग्रस्त पशुपालकांना मदत देण्यात आली. मात्र शेवटच्या टप्प्यात ज्या पशुपालकांची जनावरे ‘लम्पी’ने दगावली आहेत, असे पशुपालक अद्याप भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने ‘लम्पी’ रोगाने दगावलेल्या जनावरांसाठी आर्थिक मदत देऊ केली होती. बैलासाठी 30, गायीसाठी 20 आणि वासरांसाठी 5 हजार रुपयांची मदत दिली होती. मात्र अद्यापही शेवटच्या टप्प्यात दगावलेल्या नुकसानग्रस्त पशुपालकांना ही भरपाई मिळालेली नाही.
यंदा ‘लम्पी’ रोगाची तीव्रता कमी
जिल्ह्यात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये 6 लाखांहून अधिक गो-वर्गीय जनावरांची संख्या आहे. विशेषत: गो-वर्गीय जनावरांना या रोगाची लागण होऊ लागली आहे. यामध्ये काहींच्या दुभत्या गायी मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे दूध उत्पादनावरदेखील परिणाम झाला होता. शिवाय पशुपालकांचा गोठा या रोगाने रिता झाला होता. त्यामुळे लम्पीने गतवर्षी गो-वर्गीय जनावरांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला होता. यंदा पुन्हा या रोगाची जनावरांना लागण होऊ लागली आहे. मात्र तीव्रता कमी असल्याने अद्याप एकही जनावर दगावले नसल्याचा दावा पशुसंगोपनने केला आहे. गतवर्षी प्रथमत: गुजरात अणि महाराष्ट्रात या रोगाची जनावरे आढळून आली होती. त्यानंतर जिल्ह्यात या रोगाचा फैलाव वाढला होता. यामध्ये काहींच्या दुभत्या गायी, शर्यतीचे बैल, शेतीचे बैल आणि लहान वासरे मृत्युमुखी पडली होती.
लवकरच भरपाई देणार
गतवर्षी ‘लम्पी’ने नुकसान झालेल्या पशुपालकांना भरपाई देण्यात आली आहे. केवळ शेवटच्या टप्प्यातील पशुपालकांना भरपाई मिळाली नाही. मात्र यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच ‘लम्पी’ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाणार आहे.
– डॉ. राजीव कुलेर (पशुसंगोपन खाते सहसंचालक)