शेतकऱ्यांच्या जीवाला धोका, सुरळीत करण्याची मागणी
बेळगाव : बेकिनकेरे येथील शिवारात कमी अंतरावर लेंबकळणाऱ्या विद्युतभारित तारा शेतकऱ्यांना धोकादायक ठरू लागल्या आहेत. रविवारी वीज तारेचा धक्का बसून बिजगर्णी येथील शेतकरी दाम्पत्याचा बळी गेला आहे. त्यानंतर धोकादायक खांब आणि वीज ताऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर येऊ लागला आहे. विशेषत: ग्रामीण भागात लोंबकळणाऱ्या वीज तारा अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आतातरी हेस्कॉम लक्ष देणार का? असा प्रश्न शेतकऱ्यांतून उपस्थित होऊ लागला. बेकिनकेरे येथील शिवारात कमी उंचीवर विद्युततारा लोंबकळू लागल्या आहेत. या तारा पिकांतून गेल्या आहेत. त्यामुळे शेतात ये-जा करणे शेतकऱ्यांना धोकादायक बनले आहे. दरम्यान डोकीवरून गवत आणताना या विद्युततारांचा स्पर्श होऊ लागला आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी वीज तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे. शिवारात असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवरून अधिक दाबाच्या विद्युत तारा सर्वत्र देण्यात आले आहेत. दरम्यान पिकात विद्युत तारा लोंबकळू लागल्या आहेत. बैलगाडी आणि ट्रॅक्टरलादेखील या तारांचा स्पर्श होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भीतीच्या छायेखालीच वावरावे लागत आहे. हेस्कॉमने तातडीने लक्ष देऊन विद्युतभारित तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.