दुग्धव्यवसाय, मासेमारी, पाणीपुरवठ्यासाठी डेन्मार्क देश राज्याला करणार मदत
प्रतिनिधी/ पणजी
गोवा हे जगाच्या पर्यटनक्षेत्रासाठी जसे महत्त्वाचे राज्य आहे, तसेच येथील सोयी-सुविधा पुरवण्यासाठी सरकारला डेन्मार्क देश सहकार्य देण्यास इच्छुक आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा झाली असून, डोव्याला डेन्मार्कचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. यापुढे गोव्यातील दुग्धव्यवसाय, मासेमारी आणि पाणीपुरवठ्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरवून गोव्याला मदत करणार आहे, असे ठोस आश्वासन डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले.
गोवा राज्याला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सभापती रमेश तवडकर, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर, विधानसभेच्या सचिव नम्रता उल्मन व इतर अधिकारी उपस्थित होते.
राजदूत फ्रेडी स्वेन म्हणाले, कोविड-19 साथीच्या आजारामुळे बंद झालेली डेन्मार्क ते गोवा चार्टर उ•ाणे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे. आम्ही गोव्यासोबत काम करण्यास तयार आहोत. लवकरच आम्ही गोव्यात गुंतवणुकीची घोषणा करू. ही माझी पहिली भेट आहे आणि जेव्हा मी परत येत आहे, तेव्हा गोव्यासाठी गुंतवणुकीबाबत ठोस असे काहीतरी केलेले आपणास दिसेल, असेही स्वेन यांनी सांगितले.
राज्यात पर्यटनाची मोठी क्षमता असल्याचे सांगून स्वेन म्हणाले की, महामारीच्या काळात बंद झालेली डेन्मार्क ते गोवा चार्टर उ•ाणे पुन्हा सुरू करून गोव्याला पुन्हा ऊळावर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते म्हणाले, जेव्हा कोविड-19 साथीच्या रोगाने भारत आणि जगाच्या इतर भागांना धडक दिली आणि आम्हाला आमच्या लोकांना परत आणायचे होते, तेव्हा मदत करणारे गोवा हे पहिले राज्य होते.
दोन राज्यांमधील भिन्न हवामान परिस्थिती पाहता राज्यात तंत्रज्ञान कसे कार्य करेल असे विचारले असता, स्वेन म्हणाले, आम्ही तुम्हाला काय करावे हे सांगण्यासाठी येथे नाही, आम्ही तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी आलो आहोत. खोल समुद्रात मासेमारी आणि शेती गोव्यात संभाव्य असल्याचे आम्ही पाहतो आणि त्या दृष्टीने गोव्याला मदत केली जाईल.”
सभापती रमेश तवडकर म्हणाले की, स्वेन यांनी त्यांच्या निमंत्रणावरून राज्याला भेट दिली आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलसंपदा मंत्री सुभाष शिरोडकर आणि मत्स्यव्यवसाय मंत्री नीळकंठ हळर्णकर यांची भेट घेऊन राज्य आणि डेन्मार्क यांच्यातील सहकार्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले की, स्वेन यांनी तंत्रज्ञान देण्यासाठी आणि दुग्धव्यवसाय, आरोग्य आणि मासेमारी क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. डेन्मार्कच्या राजदूतानेही पाणीपुरवठ्यात करार करण्यास स्वारस्य दाखवले होते. राजदूत स्वेन यांनी वेर्णा, शिरोडा व काणकोण या ठिकाणची माहिती घेण्यासाठी दौरा केला.
डॅनिश कंपनी आणणार गुंतवणूक प्रकल्प
राजदूत स्वेन म्हणाले की, फारच कमी कालावधीत डॅनिश कंपनी गोवा राज्यात मूर्त गुंतवणूक प्रकल्प आणणार आहे. गोव्यातील ही अतिशय महत्त्वाची गुंतवणूक असेल. या गुंतवणुकीविषयी डॅनिश कंपनीचे अधिकारी लवकरच माहिती जाहीर करतील, असेही ते म्हणाले.
भूगर्भातील पाण्याबाबत गोव्याला प्रेरित करू
राज्यातील पाणीपुरवठ्यासाठी देण्यात येणाऱ्या सहकार्याबद्दल स्वेन यांना विचारले असता, स्वेन म्हणाले, आमच्याकडे डेन्मार्कमध्ये एक मजबूत वॉटर क्लस्टर आहे. डेन्मार्कमधील सर्व पिण्याचे पाणी भूगर्भातून येते. तो कसा घ्यायचा हे आम्ही गोवा सरकारला प्रेरित करू. भविष्यात आम्ही आज जे घोषित केले ते पाहून तुम्हाला आनंद होईल, थोड्याच कालावधीत तुम्हाला घडताना दिसेल. डेन्मार्कने तमिळनाडू, उत्तर प्रदेश, आसाम आणि राजस्थान या राज्यांशी यापूर्वीच करार केला आहे आणि हे सहकार्य गोव्यापर्यंत विस्तारेल.