तरुणभारत ऑनलाइन टीम
दापोली तालुक्यातील कुंभवे येथे साखरपुड्याच्या गाडीला अपघात होऊन 1 ठार, 6 जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की कुंभवे शिगवणवाडी येथील तुषार डिके (वय 26) यांचा साखरपुडा मंडणगड तालुक्यातील पालवणी येथे होणार होता. याकरिता हे सर्व जण एका कारमधून मंडणगडला निघाले होते. यातील गाडीच्या चालकाला गतिरोधकाचा अंदाज न आल्याने गाडी गतिरोधकावरून उडाली व पलटी झाली. यामध्ये दीपक कदम रा. मंडणगड (वय 48) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नवरदेव तुषार डिके (वय 26) रा. कुंभवे, देवेंद्र कदम (वय 17) रा. मंडणगड, समीर मते (वय 29) रा. कुंभवे, सागर भानसे (वय 25) रा. जावळे, धीरज कदम (वय 18) रा. मंडणगड व किशोर साळवी (वय 29) रा. कोंगळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.