एखादी तरुण महिला साधारणत: तिच्याशी समवयस्क असणाऱ्या युवकाशी डेटिंग करत असणे हे स्वाभाविक आहे. सध्याच्या युगात डेटिंग काही नवे राहिलेले नाही. भारतातही त्याचा प्रसार झपाट्याने होत आहे. पाश्चिमात्य देशात तर त्याचे कोणाला काहीही अप्रूप वाटत नाही, असे म्हणतात. तथापि, डेटिंगचा आणि प्रेमाचा संबंध असतोच असे नाही. कित्येक महिला डेटिंग पार्टनरचा उपयोग केवळ वेळ मजेत घालविण्यासाठी किंवा हौस म्हणून करतात, असे म्हटले जाते.
लंडन येथील शार्लिन डेव्हिस या तरुणीने या डेटिंगच्या संकल्पनेतही एक व्यवसाय शोधला आहे. ती तरुणांशी नाही, तर वृद्ध पुरुषांशी डेटिंग करते. यातून आपल्याला खूपच आनंद मिळतो, असे तिचे म्हणणे आहे. अर्थातच, ती श्रीमंत वृद्धांचीच निवड करते आणि त्यांच्याकडून दिला भरपूर पैसाही मिळतो. त्यामुळे तिचा हा डेटिंगचा व्यवसाय उत्तम चालला आहे, असाही दावा तिने केला आहे.
अशा वृद्धांना शुगर डॅडी असे संबोधले जाते. त्यांनाही आपल्यापेक्षा खूप कमी वयाच्या आणि तरुण महिलेशी एकांतात वेळ घालविणे आवडते. तेव्हा हा उभयपक्षी लाभाचा व्यवहार असतो, असे अनुभवी लोकांचे म्हणणे आहे. हे वृद्ध तिला अत्यंत महागड्या भेटवस्तू देतात. त्यांच्या पैशावर ती सहलीला जाते. तिच्या काही तासांच्या सहवासासाठी असे वृद्ध हजारो पौंड खर्च करण्यास एका पायावर तयार असतात. एकंदर, तिचे चांगले चालले असल्याचे तिचे म्हणणे आहे. पूर्वी तिचे अनेक तरुण बॉयफ्रेंडस् होते. मात्र, त्यांच्यापैकी काहींनी तिला दगा दिल्यानंतर तिने वृद्धांकडे आपला मोर्चा वळविला. हे वृद्ध आपल्या माजी मित्रांपेक्षा अधिक विश्वासार्ह आणि लाभदायक असल्याचे तिचे मत आहे.