वृत्तसंस्था/ लिलिहॅमर (नॉर्वे)
2022 च्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्व गट 1 मधील लढतीत यजमान नॉर्वेने भारताचा 3-1 अशा फरकाने पराभव केला. या पराभवामुळे आता भारताला या स्पर्धेत पुढील वर्षी विश्व गट 1 प्ले ऑफ फेरीत खेळावे लागेल.
या लढतीतील पहिल्या दिवशी भारताने आपले सलामीचे दोन्ही एकेरी सामने गमविले. नॉर्वेच्या कास्पर रुड आणि डय़ुरासोव्हिक यांनी अनुक्रमे भारताच्या पी. गुणेश्वरन आणि रामकुमार रामनाथन यांचा पराभव केला. या लढतीतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला दुसऱया दिवशी तीन सामने जिंकणे जरुरीचे होते. शनिवारी झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात नॉर्वेच्या कास्पर रुड आणि व्हिक्टर डय़ुरासोव्हिक यांनी भारताच्या युकी भांब्री आणि साकेत मायनेनी यांचा 6-3, 3-6, 6-3 असा पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केला. त्यानंतर परतीच्या एकेरी सामन्यात भारताच्या सुमीत नागलने नॉर्वेच्या लिलिनगेनवर 6-2, 6-1 अशी मात केली. हा सामना जिंकल्याने भारताने या लढतीत आपले विजयाचे खाते उघडले पण नॉर्वेने ही लढत 3-1 अशा फरकाने जिंकली. या लढतीतील परतीचा शेवटचा एकेरी सामना खेळवला गेला नाही.