अध्याय एकोणतिसावा
उद्धव भगवंताना म्हणाला, तुमची भक्ती केल्यावर चारही पुरुषार्थ, चारही मुक्ती भक्तांच्यापुढे लोटांगण घालतात. तुम्ही सर्वज्ञ असल्याने तुमच्या भक्तांच्या मनात काय आहे हे सहजी जाणता आणि त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांना देऊन टाकता. तुम्ही उत्तमोत्तम स्वामी आहात. तुमच्यामुळे साधकांना परमसुख मिळते. तुमच्यासारखा पुरुषोत्तम कुणीच नाही. तुम्ही सर्वांचे स्वामी असलात तरी तुमच्या भक्तांच्यासाठी पूर्णपणे कृपाळू असता. तेव्हा तुमच्यासारख्या स्वामींना सोडून कोण इतरांकडे जाईल? सामान्यपणे माणसांना देहातील ज्ञानेद्रीयांच्यामार्फत सुख मिळते. डोळ्यांनी उत्तम वस्तू मनुष्य बघतो. कानांनी सुमधुर संगीत ऐकतो. नाकाने उत्तमोतम फुलांच्या वासाचा आनंद घेतो. जिभेने विविध पदार्थांची चव घेतो. त्वचेने अनेक सुखद स्पर्श अनुभवतो.
एकूणच ज्ञानेंद्रियांच्यामार्फत आपल्याला खूप सुख उपभोगायला मिळते असे माणसाला वाटत असते आणि ते तसेच कायम मिळत रहावे अशी त्याची इच्छाही असते. ज्याने ह्यापलीकडे काही सुख असेल असा विचार केला नसेल त्याला हे सुख म्हणजे सर्वोत्तम सुख आहे असे वाटते पण ज्याने तुझी भक्ती करून, तुझ्या प्राप्तीचे सुख मिळवले आहे त्याला ज्ञानेंद्रियांच्यामार्फत मिळणाऱ्या सुखाची मात्तबरी वाटत नाही. कारण तो हे जाणून असतो की, तुझ्या भक्तीतून मिळणाऱ्या सुखाची गोडी एव्हढी आहे की, त्या गोडीपुढे ज्ञानेंद्रियांच्यामार्फत मिळणाऱ्या सुखाची गोडी काहीच नव्हे. बरोबरच आहे ज्याने अमृताची गोडी चाखली आहे त्याला गुळवणे कोठून गोड लागणार? एकदा तू प्रसन्न झालास की, भक्तीसुखाचा झरा भक्ताच्या हृदयातून अखंड वाहू लागतो.
ह्या सुखाच्या प्राप्तीसाठी कोणतेही कारण लागत नाही की, कोणत्याही ज्ञानेन्द्राrयाची गरज भासत नाही. ह्याचं कारण असं की, हे सुख इंद्रियांच्या पलीकडले असते. साधू तुमचा महिमा जाणतात. त्यांना माहीत असतं की, तुम्हाला भक्तांची अत्यंत आवड असून तुम्ही त्यांच्यावर करत असलेली सुखाची बरसात वर्णन करण्याच्या पलीकडची आहे. तुमची सेवा करून भक्तांना अतिशय संतोष मिळतो आणि त्यामुळे ते सुखावतात. त्या सुखामुळे देहबुद्धी, पुनर्जन्माचे दु:ख ह्या गोष्टी त्यांच्या स्वप्नातही येत नाहीत. तुमच्या भजनातून जे इंद्रियातीत सुख भक्तांना मिळते. त्यामुळे त्यांना विषयसुखाची कोणतीही अपेक्षा रहात नाही.
साहजिकच ते विषयातून विरक्त होतात. अगदी समुद्र वलयांकित रावणाच्या लंकेसारखे समृध्द राज्य जरी मिळाले तरी त्याकडे पाहून ते तुच्छत्वाने थुंकतात. अगदी सकळ भोगांसह स्वर्ग जरी त्यांच्यापुढे उभा ठाकला तर ते त्याची उपेक्षाच करतात. जे भजनात रंगून जातात त्यांना देही असून विदेही अवस्था प्रदान करून तुम्ही त्यांना सुखरूप ठेवता. सुखरूप अशासाठी म्हणायचं की, भजनात रंगून जाणाऱ्या भक्तांना तुम्ही त्रिगुणांच्या साम्यावस्थेत नेऊन ठेवता त्यामुळे ते देवता भावास पोहोचलेले असतात. त्यात तुम्ही कोणताही भेदभाव करत नाही.
हृषीकेशी तुमच्या भक्तांवरील प्रेमाची महती काय सांगावी त्यांना तुम्ही कायम संतुष्ट ठेवता. तुमची सेवा करण्यात त्यांना कोणतीही अडचण येऊ नये ह्याची व्यवस्था तुम्ही स्वत: करता. ह्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक गोष्टी सांगता येतील. सर्वप्रथम म्हणजे तुमची सेवा करण्यासाठी त्यांना कुठेही जावे लागत नाही कारण तुम्ही त्यांच्या हृदयातच राहता. त्यामुळे ते केव्हाही तुमची सेवा करू शकतात. तुमच्या सेवेसाठी कोणत्याही धनाची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे अगदी गरिबातला गरीबही तुमची सेवा करू शकतो. तुमची भक्ती करताना त्यांना कोणतेही शारीरिक कष्ट करावे लागत नाहीत. केवळ तुमच्या पायावर डोके ठेवले की, तुम्ही स्वानंदघन संतुष्ट होता. तुम्ही संतुष्ट झालात की, भक्ताचे मोठेच काम होते. तुमच्या कृपेमुळे दयाघना त्याचे प्रपंचाचे वेड संपुष्टात येते.
क्रमश: