द.आफ्रिकेच्या स्टार फलंदाजाने केली वनडेतून निवृत्तीची घोषणा : टी-20 मध्ये मात्र खेळत राहणार
वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक आणि दिग्गज फलंदाज क्विंटन डीकॉकने वनडे क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली आहे. डीकॉकच्या या निर्णयामुळे दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का बसला आहे. डीकॉक हा भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकन संघाचा भाग आहे. विश्वचषकानंतर तो वनडे क्रिकेट खेळणे थांबवणार असल्याची त्याने माहिती दिली. टी-20 मध्ये मात्र खेळत राहणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, डीकॉकने डिसेंबर 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
यंदाचा विश्वचषक भारतामध्ये होत आहे. हा रनसंग्राम 5 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी संघाची निवड करण्याची मंगळवारी अखेरची तारीख होती. टीम इंडियानंतर द. आफ्रिका संघानेही आपल्या 15 जणांच्या चमूची निवड केली. पण डीकॉकने आफ्रिकेला जोरदार धक्का दिला आहे. विश्वचषक संघात डीकॉकला स्थान देण्यात आले होते. पण त्याने विश्वचषकानंतर वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. डीकॉकच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. आयसीसीकडून याची पुष्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकन बोर्डानेही सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे.
आफ्रिकेच्या संघाची घोषणा
दरम्यान, द. आफ्रिकेच्या वनडे संघाची मंगळवारी घोषणा झाली. या संघात डीकॉकचा नावाचा समावेश आहे. हा त्याचा तिसरा व अखेरचा वनडे विश्वचषक असणार आहे. त्याने 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले होते. डीकॉकने आतापर्यंत 140 वनडे, 54 कसोटी आणि 80 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आफ्रिकेकडून आतापर्यंत एकूण 140 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 5966 धावा केल्या आहेत. यामध्ये 17 शतके व 29 अर्धशतकांचा समावेश आहे. 178 ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या राहिली आहे.
प्रतिक्रिया
‘वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा त्याचा निर्णय आम्ही समजू शकतो. दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये योगदान दिल्याबद्दल त्याला धन्यवाद देतो. आम्ही त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा देतो आणि टी-20 क्रिकेटमध्ये तो अजूनही द. आफ्रिका क्रिकेट संघाची सेवा करत राहील.
दक्षिण आफ्रिकन बोर्डाचे संचालक ऍनॉक एनक्वे