बेंगळूर येथील नगर प्रशासन खात्याकडून मनपाला आदेश : नगरसेवकांनीही पुढाकार घेणे गरजेचे
बेळगाव : शहरातील 58 प्रभागांमध्ये समिती नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेकडून वारंवार आवाहन करण्यात आले. मात्र, जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. 8 डिसेंबरपर्यंत प्रभाग समिती नेमणूक करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तेव्हा जनतेने तातडीने अर्ज घेऊन भरून द्यावेत, असे आवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे. आपल्या वॉर्डातील समस्या सोडविण्यासाठी प्रभाग समितीची निवड केली जाणार आहे. प्रारंभी प्रभाग समितीमध्ये आपले नाव नोंदविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. मात्र, त्यानंतर याला प्रतिसादच मिळत नसल्याचे दिसून आले आहे. प्रारंभी अनेकांनी अर्ज नेले. मात्र त्यांनी ते अर्ज भरून दिले नाहीत.
आताही महानगरपालिकेकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. मात्र कोणीच अर्ज नेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कौन्सिल विभागाकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. तरी ज्यांना प्रभाग समितीमध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यांनी तातडीने अर्ज घेऊन जावेत. याचबरोबर हे अर्ज भरून महापालिकेकडे द्यावेत, असे कळविण्यात आले आहे. वास्तविक, यासाठी नगरसेवकांनीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र नगरसेवकांतून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. एकूणच प्रभाग समितीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणीच पुढे येण्यास तयार नाहीत. तर नगर प्रशासन खात्याकडून मात्र प्रभाग समिती नेमण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव घालण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.