उमेदवार आमदार रुपाली नाईक यांचा गौप्यस्फोट
कारवार : आपणाला पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार सतीश सैल आणि माजी मंत्री आनंद असनोटीकर यांच्या दरम्यान ‘डील’ झाल्याचा गौप्यस्फोट कारवार मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आमदार रुपाली नाईक यांनी केला. त्या निवडणूक प्रचाराच्या दिवशी येथे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाल्या, केवळ आपणाला पराभूत करण्यासाठी इर्षेला पेटलेल्या आमदार गंगाधर भट, आनंद असनोटीकर आणि सतीश सैल या तीन कारवारच्या माजी आमदारांनी आपल्या विरोधात मोठा कट रचला आहे. काही दिवसांपूर्वी असनोटीकर यांच्या चालकाकडे मोठी रक्कम आढळली आहे. या रकमेबद्दल कसून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी करून रुपाली नाईक पुढे म्हणाल्या, कुणाच्यातरी प्लॉट विक्रीची ती रक्कम आहे, अशी सारवासारव केली जात आहे. तथापि ती रक्कम सैल यांनी आपणाला पराभूत करण्यासाठी असनोटीकर यांना दिली असावी असे तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. आपल्या मातोश्रींच्या प्रकृतीचे कारण पुढे करत असनोटीकर यांनी रिंगणातून माघार घेतली होती. आता त्यांनी सैल यांच्याशी संगत केली आहे.