जत, प्रतिनिधी
Sangli News : जत तालुक्यात यंदा ओढावलेल्या दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रमदादा सावंत यांनी बेंगलोर येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री डी.के.शिवकुमार यांची भेट घेवून जतला तुबची योजनेतून पाणी देण्याची विनंती करत,दोन्ही सरकारने समन्वय साधून या योजनेवर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने महाराष्ट्र सरकारशी पत्र व्यवहार करण्याच्या सूचना कर्नाटक जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.
जतचे आमदार विक्रमदादा सावंत यांनी सोमवारी बेंगलोर येथे डी.के.शिवकुमार यांची भेट घेतली.सध्या कर्नाटकचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.त्यामुळे यावर मार्ग काढण्यासंदर्भात सावंत यांनी शिवकुमार यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.शिवाय सध्या जतवर अस्मानी संकट ओढावले आहे.अशा स्थितीत सीमावर्ती भागात दोन्ही राज्यांनी ऐकमेकांशी समन्वय साधल्यास पाण्याच्या प्रश्नावर मार्ग काढून जनतेला दिलासा देऊ शकतो,असे मत सावंत यांनी व्यक्त केले.
कर्नाटक सरकारने विजयपूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागासाठी तुबची योजना राबवली आहे.या योजनेतून नैसर्गिक प्रवाहातून जत तालुक्यात पाणी येते.दरवर्षी पावसाळ्यात तुबची योजना कार्यन्वीत झाल्यानंतर तेथील ओव्हर फ्लोचे पाणी जत तालुक्यात येत आहे.गेल्या तीन वर्षांपासून या भागात पाणी येते.यामुळे जतच्या गडीनाड भागातील ४५ हून अधिक गावे तसेच ३० हजार एकराला याचा लाभ होवून आठ तलाव भरले जातात,अशी माहीती सावंत यांनी डी.के.शिवकुमार यांना दिली.त्यामुळे जर कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात करार झाल्यास उन्हाळ्यात कर्नाटकला महाराष्ट्र पाणी देते त्या बदल्यात पावसाळ्यात जत तालुक्याला या योजनेतून लाभ दिल्यास याचा दोन्ही राज्यांना फायदा होईल,असेही स्पष्ट केले.
कर्नाटक पुढाकार घेईल : डी.के. शिवकुमार
सावंत यांच्याशी तीस मिनीटे या विषयावर मंत्री शिवकुमार यांनी चर्चा केली.त्यानंतर कर्नाटक सकारात्मक असून,आम्ही या संदर्भात महाराष्ट्र सरकारशी पत्र व्यवहार करू.तसेच यापूर्वी दोन्ही राज्यात काय काय अहवाल सादर झाला आहे, त्याचाही अभ्यास करून किमान मानवतेच्या भूमिकेतून ऐकमेकांना मदत होईल या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.शिवाय तशा प्रकारच्या सुचनाही त्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत.यावेळी जतचे नेते बसवराज बिराजदार, मारूती मोरे,शिव बिराजदार आदी उपस्थित होते. या नंतर सावंत यांनी कर्नाटक जलसंपदा विभागाच्या अधिकारी व सचिव राकेश सिंग यांची देखील भेट घेतली.