मार्कंडेयनगरातील दुर्दैवी घटनेमुळे हळहळ
बेळगाव : खिडकीला टांगलेली दोरी गळ्यात अडकवून खेळताना गळ्याला फास लागून एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एपीएमसी रोड येथील मार्कंडेयनगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. ऐन दिवाळीत शाळकरी मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. आदित्य बसाप्पा नागराळ (वय 10) रा. मार्कंडेयनगर असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो एका खासगी इंग्रजी माध्यम शाळेत चौथीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आदित्यचे वडील कामानिमित्त हैदराबादला गेले आहेत. आई व इतर कुटुंबीय दिवाळीनिमित्त घरात साफसफाई करीत होते. त्याचवेळी खिडकीला टांगलेली एक नॉयलॉन दोरी गळ्यात अडकवून तो खेळत होता. खेळता खेळता त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा आवाज ऐकून आई खिडकीकडे धावली. दोरी कापून त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.