हृदयविकाराचा झटका : शहरात शोकाकुल वातावरण : राज्याभिषेकावेळची दुर्घटना
संकेश्वर : रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या संकेश्वर येथील शिवभक्ताचा शुक्रवार 2 रोजी रायगडावर हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेने समस्त शिवभक्तात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा येथील हिंदू स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. ओंकार दीपक भिसे (वय 20, रा. नमाज माळ, संकेश्वर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेविषयी समजलेली माहिती अशी, ओंकार हा शुक्रवारी रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी संकेश्वरहून रायगडकडे शिवभक्त रवाना झाले होते. शुक्रवारी सकाळी शिवभक्त रायगडावर सुखरुप पोहचले होते. सकाळी 11 च्या सुमारास ओंकारला अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तो जागीच मृत पावला. या घटनेची माहिती संकेश्वर शहरात पसरताच हळहळ व्यक्त होत होती. ओंकार हा येथील दुरदुंडेश्वर विद्यासंवर्धक संघ संचलित बीबीए दुसऱ्या वर्षात शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयात श्रद्धांजली वाहून दुपारनंतर महाविद्यालयाला सुटी देण्यात आली. तो येथील माजी नगरसेवक व कडधान्याचे व्यापारी दीपक भिसे यांचा सुपुत्र असून पत्रकार उत्तम भिसे यांचा पुतण्या होय. ओंकारच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
शिवप्रेमींनी वाहिली श्रद्धांजली
रायगडावर हे वृत्त कळताच गडावरील शिवप्रेमींनी घटनास्थळी दाखल होऊन आपल्या शिवभक्ताला श्रद्धांजली वाहिली. ओंकारचे निधन मनाला चटका लावणारे ठरले. रात्री अंत्यविधीप्रसंगी शिवप्रेमी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुतण्यापाठोपाठ काकाचे निधन
रायगडला गेलेला पुतणा ओंकार भिसे यांच्या निधनानंतर अवघ्या 10 तासात काका रवी पांडुरंग भिसे (वय 58) यांचेही हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. रवी आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी इस्पितळात दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी पुतण्या-काकाचे निधन झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.