प्रतिनिधी / मडगाव
कठोर परिश्र्रम, सचोटी, प्रामाणिकपणा आणि सतत काहीतरी नवीन करून पाहण्याची आवड असणारे आणि शून्यातून विश्व निर्माण करणारे कृष्णा नानू नायक यांचे काल गुऊवारी रात्री 7.45 वाजण्याच्या दरम्यान दु:खद निधन झाले. 28 मार्च 2023 रोजी त्यांनी आपल्या वयाची शंभरी पूर्ण केली होती. आज शुक्रवार दि. 29 रोजी सकाळी 11 वा. मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
कृष्णा नानू नायक हे नानू एन्टरप्रायझेस या उद्योग समूहाचे जनक. गोव्यातील प्रगतशील शेतकरी, सफल उद्योजक अशी त्यांची ओळख संपूर्ण गोव्यात होती. साधी राहणी, उच्च विचारसरणी, सचोटी, प्रामाणिकपणा व कठोर परिश्र्रमाच्या जोरावर शून्यातून विश्व उभारणारा हा शतकवीर शेकडो तऊणांना लाजवेल, अशी इच्छाशक्ती व सकारात्मकता घेऊन जीवन जगत होता.
कृष्णा नानू नायक हे आप्तइष्टांना ‘भाऊ’ या नावानेच परिचित होते. त्यांचे मूळ गाव रिवण. त्यांचे मूळ घर रिवणमधील नायक कुटुंबीयांचा चौसोपी वाडा. भाऊंचा जन्म रिवणपासून तीन चार किलोमीटर अंतरावरील कोळंब या गावी 28 मार्च 1923 रोजी झाला होता. गावात शिक्षणाची सोय जवळपास नव्हतीच. पोर्तुगीज भाषेतून प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी त्यांना सांगे गाठावे लागले. वयाच्या पाचव्या वषी त्यांची आई गेली. त्यांच्या वडिलांनी, आत्यांनी आणि बहीण नीराने त्यांना आईची कमतरता भासू दिली नाही.
दि. 8 एप्रिल 1938 रोजी त्यांनी धंद्यात पाऊल टाकले. बेताळभाटी या माजोर्डा शेजारील गावात त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. सायकलवरून अनेकवेळा डोक्मयावरून, मडगावहून बेताळभाटीपर्यंत त्यांनी मालाची ने-आण केली. अतिशय खडतर परिश्र्रम करून धंद्याचा जम बसविला. भुसारी दुकानाबरोबर त्यांनी नारळाच्या खरेदी, विक्रीचाही उद्योग सुरू केला व यशही मिळविले. 1958साली इंपोर्ट लायसन्स मिळवून त्यांनी परदेशातून विविध प्रकारचा माल मागवून त्याचाही सफल व्यापार केला. याच वषी घाऊक व्यापारात त्यांनी पदार्पण केले.
त्यांनी कृष्णा नानू नायक अँड कंपनी स्थापन केली आणि त्यानंतर कधीही मागे वळून बघितले नाही. आज त्यावेळी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचे 75 वर्षांनंतर विविध प्रकारच्या नऊ आस्थापनांच्या वटवृक्षांत रूपांतर झालेले आहे.
त्यांच्या पुत्रांनी या व्यवसायाला नवा आयाम देत, शेती ही किफायतशीर कशी करता येईल याचे उत्तम उदाहरण समस्त गोमंतकीयांसमोर ठेवलेले आहे. भाऊ हे सतत उद्यमशील होते. नावीन्याची कास त्यांनी कधीच सोडली नाही. उद्योग म्हटला की, फायद्याबरोबर तोटाही येतो. पण, तोटा येईल म्हणून पुढे पाऊल न टाकणाऱ्यांमधील ते मुळीच नव्हते. कृष्णा नानू नायक यांनी योग्य वेळ येताच वानप्रस्थाश्र्रम स्वीकारला व आपल्या मुलांच्या हातात धंद्याची सूत्रे सोडून मोकळे झाले. यातून मुलांच्याही कर्तबगारीला वाव मिळाला व त्यांनाही उर्वरित आयुष्यात आपल्या मुलांकडे ही सूत्रे देण्याची वाट मोकळी केली.
ते एक आदर्श ‘दाता’ होते. दिलेले दान या हाताचे त्या हाताला कळू न देणारे. कित्येकांचे शिक्षण, लग्न, गृहबांधणी यासारख्या गोष्टींना त्यांनी हातभार लावला होता. ‘साने गुरूजी कथामाले’च्या गोवा विभागाला तर भरीव आर्थिक हातभार लावून, त्यांची स्वत:ची वास्तू उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या रिवण व आसपासच्या परिसरातील लोकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे नोकरी देऊन, त्यांचे संसार उभे करण्यास त्यांनी मोलाचा हातभार लावलेला आहे. लग्ने जुळवणे हा भाऊंचा आवडता छंद. त्यांच्या खिशात दोन गोष्टी हमखास असायच्या, एक अतिशय छोटी कपड्याची पाकीटसदृश वस्तू व एक छोटी डायरी. डायरीत विवाहोत्सुक तऊण-तऊणींची नावे असायची. या डायरीच्या माध्यमांतून त्यांनी कित्येक लग्ने जुळवून त्यांचे सफल संसार उभे केले.