प्रतिनिधी/ सातारा
वाई तालुक्यातील यशवंतनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱया आंबेडकरनगर मधील महावीर कांतीलाल शिंदे (वय 40) यांना झाडावरून फांद्या तोडताना मेन लाईनचा शॉक बसून झाडावरच कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. फिर्याद त्यांच्या नातेवाईकांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे.
पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, महावीर शिंदे हे बुधवार 31 रोजी दुपारी तीनच्या सुमारास शेळीला पाला काढण्यासाठी झाडावर चढले असता लाईटच्या वायरचा कुऱहाडीला स्पर्श होऊन शिंदे यांना शॉक बसला व ते झाडावरच कोसळले. तशाच अवस्थेत ते बराच वेळ झाडावरच पडून होते, पोलीस घटनास्थळी दाखल झाले व महावितरणला पाचारण केले. मुख्य लाईन बंद करून त्यांना खाली उतरविण्यात आले. उपचारासाठी शिंदे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून आंबेडकर नगरावर शोककळा पसरली आहे, अधिक तपास वाई पोलीस करीत आहेत.