ऑनलाईन टीम / तरुण भारत :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील 4-5 दिवसांपासून त्यांना धमकीचे फोन येत होते. याप्रकरणी राणा यांना पोलिसांत तक्रार दाखल केली असून, संबंधितावर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
राणा यांनी राजापेठ पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन, मागील 4-5 दिवसांपासून त्यांना 088055 41949 या क्रमांकावरून विठ्ठल राव नावाच्या व्यक्तीचा फोन येत होता. त्या व्यक्तीने आपण तिवसामधून बोलत असल्याचे सांगितले. तसेच ‘तू गर्दीच्या ठिकाणी जाते, त्या ठिकाणी मी कधीही चाकूने वार करून ठार करेन, तुला कळणारही नाही’, अशी धमकी देत अश्लील शिवीगाळ करत होता.
धमकीचे फोन येत असल्यामुळे नवनीत राणा यांच्या वतीने तातडीने राजापेठ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू केला आहे.