नेगील योगी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण घटल्याने या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. बेळगाव व खानापूर तालुक्यामध्येही पावसाचे प्रमाण कमी आहे. अपेक्षेनुसार पाऊस झाला नसल्याने पिके करपून जात आहेत. या तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत रयत संघटनेतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. राज्यातील 195 तालुक्यांत अपेक्षानुसार पाऊस झाला नसल्याने दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला असतानाही या तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. पावसाअभावी या दोन्ही तालुक्यांतील भात, सोयाबिन, रताळी, बटाटा, ऊस, भुईमूग, मका आदी पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात चारा समस्येला सामोरे जावे लागणार आहे. असे असतानाही राज्य सरकारकडून बेळगाव व खानापूर तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.
उपग्रह आधारावर सर्वेक्षण करून हा अहवाल देण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. या दोन्ही तालुक्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस असताना कोणत्या आधारावर सर्वेक्षण करण्यात आल्याचा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. भात पिकाची वाढ खुंटली आहे. बटाटा पीक करपले आहे. असे असताना कृषी अधिकाऱ्यांनी कोणता सर्व्हे करून अहवाल दिला, असा सवाल जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित करण्यात आला. आपणाला न्याय मिळालाच पाहिजे. या दोन्ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट केलेच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. बराचवेळ आंदोलन करूनही जिल्हाधिकारी न आल्याने कार्यालयाच्या आवारात येवून शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्याशिवाय उठणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कृषी अधिकारी व बागायत खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन परिस्थितीची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. शेतकरी नेते रवी पाटील, राजू मरवे, रमाकांत कोंडुस्कर, रणजीत चव्हाण-पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.